प्रतिनिधी / सातारा :
प्रशासनाचा लॉकडाऊनचा निर्णय सातारकरांवर अन्यायकारक आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक, शेतकरी यांचे हाल होत आहेत. कडक लॉकडाऊनला सातारकरांचा विरोध होत आहे. प्रशासनाने काही प्रमाणात निर्बंध लावून लॉकडाऊन उठवावा, अशी भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी माध्यमांसमोर मांडली. उपमुख्यमंत्री अजितदादा, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ज्या सूचना दिल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मी अधिवेशनात मुद्दा मांडणार आहे, असेही त्यांनी यावेळी निक्षून सांगितले.
प्रशासनाने सक्तीने लॉकडाऊन लादला आहे. त्याबाबत बोलणारे पहिलेच आमदार शिवेंद्रसिंहराजे आहेत. त्यांनी सुरुची निवासस्थानी पत्रकार परिषद घेवून भूमिका स्पष्ट केली. प्रशासनाच्या विरोधात शिवेंद्रराजेंनी एल्गार पुकारला आहे. ते बोलताना म्हणाले, सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने शासनाने कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. आठवडाभरच लॉकडाऊन शिथील झाले होते. त्यामुळे व्यावसायिक, शेतकरी यांना संधी मिळाली होती. तीही आता गेली आहे. त्यामुळे प्रशासनाने घेतलेल्या कडक लॉकडाऊनच्या निर्णयाला सातारकरांचा विरोध आहे. काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला विरोध दर्शवला काहींनी आंदोलन करुन विरोध व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाला माझी एकच सुचना आहे. लॉकडाऊन मागे घ्यावे. वेळेचे निर्बंध ठेवा परंतु, कडक लॉकडाऊन करु नका. दोन दिवसाचे कडक लॉकडाऊन करा, असेही ते म्हणाले.









