रेल्वे सेवा पूर्वपदावर येताच साडेसात हजार प्रवाशांचा विनातिकीटाचा प्रवास
प्रतिनिधी / मिरज
कोरोनाच्या दुष्टचक्रामुळे रेल्वेची आर्थिक चाके रुतली असताना फुकट्या प्रवाशांनी मात्र, रेल्वे प्रशासनाला हैराण करुन सोडले आहे. कोरोनाचा प्रभाव कमी होऊन रेल्वे सेवा पूर्वपदावर येताच जून महिन्यात मध्य रेल्वे पुणे विभागाच्या विविध रेल्वे स्थानकांवर तब्बल सात हजार, 331 प्रवासी विनातिकीटाचे फुकटात प्रवास करताना आढळून आले आहेत. या फुकट्या प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने 29 लाख, 29 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मध्य रेल्वे पुणे विभागाच्या प्रबंधक श्रीमती रेणु शर्मा, अपर मंडल रेल प्रबंधक सहर्ष बाजपेयी यांच्या आदेशानुसार वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, श्याम कुलकर्णी, सहायक वाणिज्य प्रबंधक एस. व्ही. एन. सुभाष यांच्या नेतृत्वाखाली तिकीट तपासणी पथकाने ही कारवाई केली.
मे महिन्यात चार हजार 347 प्रवासी विनातिकिट प्रवास करताना आढळून आले होते. त्यावेळी रेल्वेने त्यांच्याकडून 17 लाख, 28 हजारांचा दंड वसूल केला होता. मात्र, जून महिन्यात तब्बल सात हजार, 331 प्रवासी विनातिकाटाचे प्रवास करताना आढळून आले. या प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने 30 लाखांचा दंड वसूल केला.