प्रतिनिधी / सातारा :
व्यापाऱ्यांच्यावर लॉकडाऊन लादला जात आहे. कापड व्यावसायिकांसह इतर व्यावसायिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. बँकाचे कर्जाचे हप्ते, नोकरवर्गाचे पगार, लाईट बील, शासनाचे इतर कर भरावे लागतात. सततच्या लॉकडाऊनमुळे आम्ही सर्व व्यापारी कर्जबाजारी झालो आहोत.
जिल्हाधिकाऱ्यांना नेमके काय करायचे आहे, हेच आम्हाला समजत नाही. त्यांच्या लॉकडाऊन निर्णयाचा आम्ही खेद व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी दिली. दरम्यान, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निषेधार्थ घोषणाही दिल्या. त्यावेळी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी त्यांची समजूत काढली.
पोवई नाक्यावर सकाळी व्यापारी रतन टी हाऊसच्या बाहेर जमले. त्यामध्ये सुशांत नावंधर, रियाज मुल्ला, अमर जाधव, विक्रांत राठी, विजय येवले, अनिल राजपाल आदी व्यापारी एकत्र जमले. त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुन्हा ब्रेक द चैन अंतर्गत लागू करण्यात आलेल्या शनिवारपासूनच्या निर्बधाबाबत तीव्र शब्दात खेद व्यक्त केला.
यावेळी बोलताना व्यापारी म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी जो काय निर्णय घेतला आहे. तो जुलमी आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे आम्हा व्यावसायिकांची पुरती वाट लागलेली आहे. शहरातील कापड विक्रेते असतील, स्टेशनरी कटलरी असतील, हॉटेल व्यावसायिक असतील, लग्नपत्रिका छपाईवाले असतील यांनी भाड्यानी घेतलेल्या गाळय़ांचे भाडे देता येत नाही. कर्जाचे हप्ते थकल्याने बँक, सहकारी पतपेढयावाले मागे लागलेले आहेत. त्यांचे वेळेवर हप्ते देता येत नाहीत. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्याचा निषेध करतो आहोत, असे म्हटले आहे. दरम्यान, व्यापारी एकत्र जमल्याचे पाहिल्यानंतर तेथे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे दाखल झाले. त्यांनी व्यापाऱ्यांची समजून काढली. परंतु व्यापाऱ्यांनी आमचा आवाज शासनापर्यंत पोहचू द्या, अशी आर्जव केली.









