ग्रामपंचायत शिष्टमंडळास दिली ग्वाही, आमदार आसगांवकर यांच्यामार्फत पाठपुरावा
प्रतिनिधी / सांगरूळ :
जिल्हा परिषदेच्या दवाखान्यातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळण्यासाठी राज्यातील आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. सांगरूळ (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून अधिक चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून केलेल्या मागणीचा विचार करून सांगरुळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांनी दिली.
पुणे विभागाचे शिक्षक आ. जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगरूळ ग्रामपंचायतीच्या वतीने सांगरुळ गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अपुरा कर्मचारी स्टाफ व असणाऱ्या समस्या, नविन इमारत, लसीकरण व विविध प्रलंबबित विकास कामांसाठी आरोग्य मंञी मा. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निवेदन सादर केले .
यावेळी आमदार प्रा. आसगावकर यांनी सांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध हव्यात यासाठी शासन स्तरावरून भरीव सहकार्य करावे अशी मागणी आमदार प्रा. आसगावर यांनी आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्याकडे केली.
सांगरुळचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव खाडे यांनी सांगरुळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सांगरूळ सह ग्रामीण भागातील वाड्या व वस्त्यांचा समावेश होत असून या भागातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला उपचारासाठी या केंद्रावर अवलंबून राहावे लागत असून सध्या या आरोग्य केंद्रांच्या समस्या मांडल्या. आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी निधी दयावा अशी मागणी श्री खाडे यांनी नामदार पाटील यांच्याकडे केली. यावेळी उपसरपंच सुशांत नाळे, ग्रा. प.सदस्य सचिन डी. नाळे, आनंदा इंगळे, सर्जेराव मगदुम व सागर नाळे उपस्थित होते.









