प्रतिनिधी /बेळगाव
मागील सहा महिन्यांपासून स्मार्ट सिटीच्या कामामुळे बंद असलेले बसस्थानकाचे जुने प्रवेशद्वार पूर्ववत खुले करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात स्मार्ट सिटीअंतर्गत भव्य बसस्थानक उभारण्यात येत आहे. या कामासाठी जुने बसस्थानक बंद करून पर्यायी प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र या ठिकाणी प्रवाशांबरोबर वाहतुकीची कोंडी होत होती. शिवाय खडेबाजारातून येणाऱयांना वळसा घालून बसस्थानकात प्रवेश करावा लागत होता. त्यामुळे जुने प्रवेशद्वार खुले करावे, अशी मागणी प्रवाशांतून होत होती. मागील दोन दिवसांपासून जुने प्रवेशद्वार खुले करण्यात आले असून येथून प्रवाशांबरोबर स्थानिक बसबरोबरच कोल्हापूर व खानापूर बसची ये-जा सुरू आहे.
स्मार्ट बसस्थानकाच्या कामामुळे सर्किट हाऊसपासून जुन्या भाजी मार्केटकडे जाणाऱया मार्गावर पर्यायी प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या मार्गावर इतर खासगी वाहनांची संख्यादेखील अधिक आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. मात्र आता जुने प्रवेशद्वार खुले केल्याने पर्यायी प्रवेशद्वारावरील ताणदेखील कमी झाला आहे.









