देशभरातील 34 चित्रकारांमधून निवड, 15 ऑगस्टला होणार राजस्थानमध्ये चित्रांचे प्रदर्शन : नादावडेकर पितापुत्र देवगड तालुक्यातील गवाणेचे सुपुत्र

चित्रकार अव्दैत नादावडेकर यांनी राष्ट्रीय चित्र प्रदर्शनासाठी साकारलेली
3. लोकमान्य टिळक. 4.स्वातंत्र्यवीर सुभाषचंद्र बोस,
प्रशांत वाडेकर / देवगड:
भारतीय स्वातंत्र्य लढय़ात महत्त्वपूर्ण योगदान देणारे मंगल पांडे, लाला लजपतराय, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक अशी थोर स्वातंत्र्यवीरांची चित्रे आपल्या कुंचल्यातून साकारण्याचा बहुमान सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील गवाणे येथील सुपुत्र असलेल्या व ठाणे येथे राहणाऱया चित्रकार किशोर, अद्वैत नादावडेकर या पितापुत्रांच्या जोडीला मिळाला आहे. नादावडेकर पितापुत्रांना देशभरातून 34 चित्रकारांच्या पंक्तीत कला सादर करण्याचा मान मिळाला आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राजस्थान उदयपूर येथील ‘भघोर की हवेली’ येथे या चित्रांचे प्रदर्शन भरणार आहे.
यावषी स्वातंत्र्य मिळून भारताला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने उदयपूरच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या प्रमुख किरण सोनी गुप्ता यांनी ऑनलाइन ‘शौर्य आर्ट कॅम्प’ आयोजित करण्याचे ठरविले. महाराष्ट्र आसाम, उत्तर प्रदेश, कोलकाता, दिल्ली, नैनीताल अशा ठिकाणांहून 34 उत्तम चित्रकारांची निवड यासाठी करण्यात आली. यामध्ये ठाण्यातील ज्ये÷ चित्रकार किशोर नादावडेकर आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथे शिकणारा त्यांचा 20 वषीय मुलगा अद्वैत यांचा समावेश आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱया सैनिकांच्या जीवनावर प्रत्येक कलाकाराने दोन चित्रे काढायची होती. किशोर नादावडेकर यांनी इंग्रजांच्या सैन्यात असणारे परंतु काडतूस प्रकरणामुळे संतापून इंग्रजांविरुद्ध लढणारे मंगल पांडे आणि ‘सायमन परत जा’ असे ठणकावून सांगणारे लाला लजपतराय यांची चित्रे तयार केली. तर अद्वैतने विदेशी कपडय़ांची होळी करणारे, सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करणारे लोकमान्य टिळक आणि इंग्रजांविरुद्ध ‘आझाद हिंद सेना’ तयार करणारे सुभाषचंद्र बोस यांची चित्रे काढली. ही चित्रे काढण्यासाठी अद्वैतने या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल वाचन केले. अनेक महत्त्वपूर्ण योगदान देणाऱया स्वातंत्र्य व्हिडिओ, चित्रपट पाहिले. या अभ्यासांती अद्वैतने रेखाटलेल्या या चित्रांची निवड झाली आहे.
उदयपूर येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने कोरोनाच्या काळात चित्रकारांना प्रोत्साहन आणि आर्थिक सहाय्य मिळावे, म्हणून या शौर्य कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ऑगस्ट रोजी या चित्रांचे या कॅम्पमध्ये प्रदर्शन भरविले जाणार आहे.
या बाबत बोलताना चित्रकार किशोर नादावडेकर म्हणाले, ‘एवढय़ा मोठय़ा कार्यक्रमासाठी चित्रे काढायला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. सर्व प्रतिथयश कलाकारांमध्ये अद्वैत एकमेव वयाने लहान विद्यार्थी आहे. त्याच्यासाठी ही राष्ट्रीय आर्ट कॅम्पमधील पहिली सुवर्णसंधी आहे’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर वडिलांबरोबर पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर कला सादर करायला मिळाल्याचा आनंद असल्याचे अद्वैतने सांगितले.
चित्रकार किशोर नादावडेकर हे प्रसिद्ध चित्रकार असून त्यांच्या चित्रांचे विविध देशात प्रदर्शन भरविले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दालनातही त्यांच्या चित्रांचा समावेश आहे. नादावडेकर यांची अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात चित्रे प्रदर्शित झाली आहेत. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.









