सोन्याची चेन, अंगठी लंपास : कुपवाड एमआयडीसीतील प्रकार
प्रतिनिधी / कुपवाड
पोलिस असल्याचे भासवून काही अज्ञातांनी कानडवाडीच्या वृद्धास लुबाडल्याचा प्रकार कुपवाड एमआयडीसीत घडला आहे. वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चेन व अंगठी मिळून ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला असून याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली आहे. जिनपाल बाळीशा खोत (रा. कानडवाडी) यांनी फिर्याद दिली असुन पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी जिनपाल खोत सोमवारी दुपारी दुचाकीवरून कुपवाडहून एमआयडीसीमार्गे कानडवाडीला जात होते. कानडवाडी रस्त्यालगत नवीन क्वालिटी पॉवर कंपनीच्या समोरील मुख्य रस्त्यावर एका अज्ञात व्यक्तीने खोत यांना हात करून थांबविले. यावेळी त्याने ‘मी’ पोलिस असल्याचे भासवून त्याचेकडील ओळखपत्रही दाखवले. जनतेच्या सुरक्षिततेसाठी ‘माझी या ठिकाणी नेमणूक केली आहे, असे संगन खोत यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील अंगठी काढून घेत स्वतः जवळ ठेवली. कागदाच्या पेपरमध्ये खडे बांधून ती पूडी खोत यांच्या शर्टाच्या खिशात ठेवून चोरट्याने मोटारसायकलवरून पोबारा केला. खोत यांनी घरात जावून खिशात ठेवलेला कागद बाहेर काढून पाहिला असता त्या कागदात सोन्याचे दागिने नसल्याचे आढळले. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खोत यांनी सोमवारी रात्री कुपवाड पोलिसात फिर्याद दिली.








