प्रतिनिधी /बेळगाव
एप्रिल महिन्यात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे घरपट्टीच्या पाच टक्के सवलतीची मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली होती. मात्र संपूर्ण लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला. तसेच बेळगाव वन कार्यालयेदेखील बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे दिलेल्या मुदतीचा काहीच उपयोग झाला नाही. तर पाच टक्के सवलतीच्या मुदतीत आता पुन्हा एक महिन्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
आगाऊ घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना एप्रिल महिन्यात पाच टक्के सवलत देण्यात येते. मात्र लोकसभा पोटनिवडणुकीमुळे महापालिकेचे कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त होते. तसेच कोरोनाचा प्रभाव वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे पाच टक्के सवलतीची मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली होती. पण कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने राज्यात लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आली. दि. 21 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने मालमत्ताधारकांना घरपट्टी भरण्यास अडचणी निर्माण झाली होती. तसेच लॉकडाऊनमुळे बेळगाव वन कार्यालयेदेखील बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे पाच टक्के सवलतीचा लाभ मालमत्ताधारकांना घेता आला नाही. याची दखल घेऊन नगरविकास खात्याने पाच टक्के सवलतीच्या मुदतीत वाढ केली आहे. दि. 31 जुलैपर्यंत ही मुदत वाढविण्यात आली असून जुलै महिन्यात घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना पाच टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. पाच टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी मालमत्ताधारकांनी वेळेत घरपट्टी भरावी. दि. 31 जुलैनंतर घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना सवलतीचा लाभ मिळणार नाही. नियमानुसार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात यावी, असे पत्रक नगरविकास खात्याने महापालिकेला पाठविले आहे.









