तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
शेटफळ-कुर्डुवाडी रोडवर आयशर टेम्पो (एम एच २१ एक्स ९१११ ) अडवून चौघा जणांनी चालकाकडील रोख रक्कम, मोबाईल व इन्हर्टर बॅटऱ्या असा एकूण ९८ हजारांचा माल लुटून पोबारा केला. ही घटना दि.२५ रोजी पहाटे ३ ते ३.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत बळीराम विष्णू बामणे रा. धाकलगाव जि.जालना याच्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिसांत अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी बामणे यांना कोल्हापूर, जयसिंगपूरहून बीड केज येथे प्रियाकल कंपनीच्या इनव्हर्टर व गाड्यांच्या बॅटऱ्या पोहोच करण्याचे भाडे मिळाले. दि.२४ रोजी रात्री १०.३० वाजता फिर्यादी बामणे जयसिंगपूर येथील प्रियाकल कंपनीतून सदर बॅटऱ्या घेऊन पंढरपुर, कुर्डुवाडीमार्गे बीडकडे निघाले. दरम्यान दि.२५ रोजी पहाटे ३ ते ३.३० च्या दरम्यान शेटफळ-कुर्डुवाडी रोडवर पाठीमागून येणारी पांढऱ्या रंगाची टाटा सुमो आयशर समोर आडवी येऊन थांबली. सुमोमधून चार लोकांनी उतरून फिर्यादीला खाली खेचले. फिर्यादीला दमदाटी व काठीने मारहाण केली. त्याच्या जवळील रोख ७ हजार रुपये, ८ हजारांचा मोबाइल व ८३ हजारांच्या छोट्या, मध्यम व मोठ्या आकाराच्या एकूण १२ बॅटऱ्या असा मिळून ९८ हजारांचा माल लुटून चोरट्यांनी शेटफळच्या दिशेने पलायन केले.