ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरात राज्यातील 8 नगर निगम आणि वापी, अंकलेश्वर, मेहसाणा, गांधीनगर सह एकूण 18 शहरांमध्ये नाईट कर्फ्यूसह निर्बंध जारी असणार आहेत. या 18 शहरांमध्ये नाईट कर्फ्यू रात्री 10 वाजल्यापासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. या सोबतच आता रात्री 9 वाजेपर्यंत शहरातील हॉटेल्स सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर रात्री 12 वाजेपर्यंत पार्सल सेवा सुरू असणार आहे.
ज्या शहरांमध्ये कर्फ्यू जारी करण्यात आला आहे, अशा शहरांमधील व्यापाऱ्यांना 30 जून पर्यंत लसीकरण करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर अन्य भागातील व्यापाऱ्यांना यासाठी 10 जुलै पर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. प्रदेशातील बाग, उद्याने आता रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असणार आहेत. तर थिएटर देखील 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
यासोबतच सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी असेल मात्र, यामध्ये जास्तीत जास्त 200 जणांना सहभाग घेता येणार आहे. विवाह समारंभास 100 जणांची उपस्थिती तर अंतिम विधीसाठी 40 नागरिकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोर कमिटीने राज्यात 75 टक्के क्षमतेने एमटीएस, बीआरटीएस आदी बसेसचे संचालन करण्यास मंजुरी दिली आहे. तर 60 टक्के क्षमतेने शहरातील लायब्ररी, पुस्तकालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये सद्य स्थितीत 4,427 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 8 लाख 08 हजार 418 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 10,042 जणांनी आपला जीव गमावला आहे. गुरुवारी राज्यात रेकॉर्ड ब्रेक म्हणजेच 4 लाख 44 हजार 656 जणांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत 2 कोटी 39 लाख 2 हजार 371 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.