महिला-बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांची अधिकाऱयांना सूचना : तिसऱया लाटेत मुलांना धोका
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाच्या तिसऱया लाटेचे संकेत तज्ञांनी दिले आहेत. त्या लाटेमध्ये मुलांना जास्त धोका असल्याचे सांगितले जात आहे. तेव्हा मुलांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये याची दक्षता घ्या, अशी सूचना महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी अधिकाऱयांना केली आहे.
बुधवारी जिल्हा पंचायत सभागृहात बैठक घेण्यात आली. बाल संरक्षण आणि काळजी घेण्यासंदर्भात ही बैठक घेण्यात आली. मुलांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी वैद्यकीय व्यवस्था सज्ज ठेवावी. आपत्कालीन काळात सर्वांनी एकजुटीने काम करून मुलांची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
पहिल्या व दुसऱया लाटेमध्ये मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. मात्र, आता तिसऱया लाटेमध्ये मुलांना त्रास होण्याची शक्मयता आहे. तेव्हा मुलांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटरची सुविधा उपलब्ध करून सज्ज ठेवावी, असेही त्या म्हणाल्या.
52 मुले अनाथ
जिल्हय़ामध्ये कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला. मुलांचे पालक दगावल्यामुळे जिल्हय़ातील 52 मुले अनाथ झाली आहेत. त्या सर्वांची जबाबदारी महिला आणि बालकल्याण खात्याने घेतली आहे. त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातील. मुख्यमंत्री बालसेवा योजनेंतर्गत या मुलांना दरमहा साडेतीन हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. 18 वर्षांनंतर मुलींना 1 लाखाची मदत करण्याचे ठरविले आहे, अशी माहितीही शशिकला जोल्ले यांनी दिली.
यावेळी आमदार महांतेश दोड्डगौडर यांनी अंगणवाडय़ा खराब झाल्या आहेत. त्यांची दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली आहे. बेळगाव जिल्हा मोठा आहे. त्यामुळे या जिल्हय़ाला अधिक निधी देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुसऱया लाटेत 2 हजार मुले कोरोनाबाधित
जिल्हय़ामध्ये पहिल्या लाटेत 700 हून अधिक मुले तर दुसऱया लाटेत 2 हजार मुले कोरोनाबाधित झाली. त्यांच्यावर योग्यप्रकारे उपचार केल्यामुळे ती बरी झाली. दुसऱया लाटेमध्ये मात्र चार मुलांचा मृत्यू झाला. इतर मुले मात्र पूर्णपणे बरी झाल्याची माहिती बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. उमेश कुलकर्णी यांनी दिली.
तालुका आरोग्य केंद्र तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मुलांवर उपचार करण्यासाठी सध्या सर्व तयारी सुरू आहे. याबाबत आम्ही यंत्रणा सज्ज केली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ यांनी दिली.
पौष्टिक खाद्य किट-व्हिलचेअरचे वितरण
कुपोषित मुलांना पौष्टिक खाद्याच्या किटचे वाटप करण्यात आले. दिव्यांग मुलांना व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले. देवदासी आणि तृतीयपंथींनाही यावेळी किटचे वाटप मंत्री शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी चिकोडीचे खासदार आण्णासाहेब जोल्ले, बेळगावच्या खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, महिला व बालकल्याण विभागाच्या उपसंचालक राधा बसवराज वरवट्टी व इतर अधिकारी उपस्थित होते.









