दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन
प्रतिनिधी /बेळगाव
मृग नक्षत्रामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असले तरीही शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. पावसाळय़ातही पाणी टंचाई निर्माण झाल्याने शहरवासीयांतून संताप व्यक्त होत आहे.
शहरात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. राकसकोप जलाशयामध्ये जून अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा होता. मृग नक्षत्रामध्ये झालेल्या पावसात राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत चार फुटाने वाढ झाली आहे. तरीदेखील शहरवासीयांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पाणीसाठा मुबलक असतानादेखील शहराच्या मध्यवर्ती भागात वेळेत पाणीपुरवठा केला जात नसल्याची तक्रार शहरवासीय करीत आहेत.
काकतीवेस, कंग्राळ गल्ली, नार्वेकर गल्ली, कडोलकर गल्ली, रिसालदार गल्ली, खडक गल्ली अशा विविध भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. कडोलकर गल्ली परिसरात वापराकरिता नवग्रह विहिरीच्या पाण्याचा होत असलेला पुरवठादेखील ठप्प झाला आहे. याबाबत चौकशी केली असता हिडकल जलवाहिनीला गळती लागल्याने शहराच्या काही भागात व्यत्यय निर्माण झाला असून येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले.









