पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन : कणकवलीत श्रीधर नाईक स्मृतिदिन कार्यक्रम
पुतळा अन् नामफलकाचेही अनावरण : एकसंधपणे दहशतवादी प्रवृत्तीविरोधात लढूया!
प्रतिनिधी / कणकवली:
22 जून हा सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या राजकारणातला काळा दिवस आहे. कै. श्रीधर नाईक हे राजकारणापलिकडे जाऊन काम करणारे नेते होते. दहशतीविरोधात लढण्यासाठी कोणी अंगावर आला, तर शिंगावर घेण्याचा पायंडा त्यांनी जिल्हय़ात पाडून दिला आहे. कार्यकर्त्यांना अनेक आदर्श त्यांनी घालून दिले, ते आदर्श घेऊन सर्वांनी काम करूया. दहशतवादी प्रवृत्ती सिंधुदुर्गातून हद्दपार झाली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकसंघ होऊन या प्रवृत्तीविरोधात लढलं पाहिजे. हा स्मृतिदिनाचा कार्यक्रम भाषणापुरता न राहता, सर्वांनी एकत्रित येत पुढील स्मृतिदिनापूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समित्या ताब्यात आणल्या, तर ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
श्रीधरराव नाईक यांच्या 30 व्या स्मृतिदिनानिमित्त नूतन पुतळय़ाचे अनावरण सामंत यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात सामंत बोलत होते. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, ब्रिगेडियर सुधीर सावंत, गौरीशंकर खोत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, नीलम पालव, शिवसेना नेते अतुल रावराणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, विकास सावंत, काका कुडाळकर, साईनाथ चव्हाण, विकास कुडाळकर, जि. प. सदस्य संजय आंग्रे, स्वरुपा विखाळे, उपजिल्हाप्रमुख राजू शेटय़े, बाळा भिसे, भास्कर राणे, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, अबिद नाईक, संकेत नाईक, प्रसाद रेगे, मुरलीधर नाईक, विलास कोरगावकर, रामू विखाळे, ऍड. हर्षद गावडे, सतीश नाडकर्णी, एम. के. गावडे, महेश देसाई यांच्याप्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
श्रीधर नाईक यांचे राजकारणापलिकडे काम होते. त्यांनी अनेक आदर्श कार्यकर्त्यांना घालून दिले आहेत. पुढील निवडणुकीत जो उमेदवार असेल, त्याला निवडून आणण्याची आपण सर्वांनी शपथ घेऊया, असे आवाहनही सामंत यांनी केले.
जिल्हय़ातील दहशत हटविण्याचे काम!
खासदार राऊत म्हणाले, काही समाजकंटकांनी श्रीधर नाईक यांची हत्या करून जिल्हय़ात दहशत माजविली. त्यामुळे जिल्हय़ाचे नाव बदनाम झाले. मात्र, जनतेने या अपप्रवृत्तीविरोधात लढा देऊन जिल्हय़ातील दहशत हटविण्याचे काम केले. त्यामुळे आता शांतता निर्माण होत आहे. श्रीधर नाईक यांचे बलिदान व्यर्थ गेलेले नाही. त्यांच्या बलिदानातून अपप्रवृत्तीविरोधात लढण्यासाठी आमच्यासारखे अनेक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते निर्माण झाले. त्यांचा समाजसेवेचा आदर्श घेऊन आपण काम करू तसेच अनाथांना आधार देण्यासाठी श्रीधर नाईक यांच्या नावाने एक ट्रस्ट सुरू करण्याचे आवाहन त्यांनी श्रीधर नाईकप्रेमींना केले.
नाईक यांच्या कार्याचा वसा पुढे नेण्याचा प्रयत्न!
आमदार वैभव नाईक म्हणाले, श्रीधर नाईक यांची हत्या आम्हा कुटुंबियांच्या मनाला चटका लावणारीच होती. त्यांचे विचार नवीन पिढीला आत्मसात व्हावेत, यासाठी त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम आम्ही राबवून त्यांच्या कार्याचा वसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. समाजघातक प्रवृत्तीविरोधात लढा देत आहोत. श्रीधर नाईक यांनी आपल्या छोटय़ाशा कारकिर्दीत समाजकार्यातून नावलौकिक मिळविला. अनेकांना आर्थिक मदत करणे, जनतेच्या अडीअडचणी सोडविणे, युवकांना नोकरीला लावणे, व्यवसायात मदत करणे, अन्यायाला वाचा फोडणे, अशी एक ना अनेक कार्ये त्यांनी केली. स्मृतिदिनानिमित्त त्यांचे कार्यकर्तृत्व लोकांसमोर येत आहे. यातून नक्कीच जिल्हय़ात एक चांगला विचार रुजेल. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आपली लढाई ही प्रवृत्तीच्या विरोधातील असून ती सर्वांनी एकसंघपणे लढली पाहिजे आणि त्यातून ही प्रवृत्ती हाकलून लावली पाहिजे, असे सांगितले. गौरीशंकर खोत आदींनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन नीलेश पवार यांनी केले.
52 जणांनी केले रक्तदान
या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 52 जणांनी रक्तदान केले. तसेच नाथ पै नगर येथे रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी नगरसेविका मानसी मुंज, अजित काणेकर, सुभाष राणे, सिद्धेश सावंत आदी उपस्थित होते.









