ऑनलाईन टीम / लखनऊ :
अयोध्येतील राम मंदिराच्या नावे देणगीसाठी बनावट बेबसाईट तयार करुन रामभक्तांकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार उत्तरप्रदेशात उघडकीस आला आहे. याप्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
नवीन कुमार सिंग (वय 26), सुमित कुमार (22), अमित झा (24), आशिष गुप्ता (21) आणि सुरज गुप्ता (22) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींनी ‘राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या’ या नावाने बेकायदेशीर वेबसाईट तयार केली होती. या बेबसाईटमध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱयांसाठी बँकेचा खाते क्रमांक देण्यात आला होता. या वेबसाईटद्वारे आरोपींनी रामभक्तांकडून लाखो रुपये उकळले आहेत. लोकांकडून देणगीच्या नावाखाली पैसे उकळणे सुरू असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर नोएडा सायबर पोलीस ठाणे आणि लखनऊ सायबर क्राईम मुख्यालयातील पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.









