24 तासात घातले 3730 सूर्यनमस्कार : एशिया बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
प्रतिनिधी /पणजी
बांबोळी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यनमस्कारमध्ये आतापर्यंत रेकॉर्ड करणारे पंकज सायनेकर यांनी आपला स्वतःचा मागील रेकॉर्ड मोडला आणि 24 तासांमध्ये 3730 सूर्यनमस्कार घेऊन एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तसेच एशिया बूक ऑफ रेकॉर्डसमध्ये आता त्याची नोंद होणार आहे.
रविवारी सकाळी 9 ते सोमवारी योगदिनी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तासांत पंकज सायनेकर यांनी ‘सूर्यनमस्कार’ घालण्याचा एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला. सोमवारी सकाळी झालेल्या एका छोटेखानी समारंभास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व केंद्रीय श्रीपाद नाईक हे उपस्थित होते. एशिया बूक ऑफ रेकॉर्डसचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी पंकज सायनेकर यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. डॉ. प्रँकलीन हर्बटदास, जॅको ली रॉक्स आदी मंडळी यावेळी उपस्थित होती.
सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून पंकज सायनेकर यांनी हा नवा विक्रम प्रस्थापित करताना इ. स. 2013 मध्ये केलेला आपलाच विक्रम मोडला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी या विक्रमाबद्दल त्याचे कौतुक केले.
युवापिढीने पंकज यांचा आदर्श घ्यावा : मुख्यमंत्री
यावेळी डॉ. प्रमोद सावंत यांनी सायनेकर यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले. ते म्हणाले की, सूयनमस्कारांमध्ये प्रचंड उर्जा आहे. पंकज सायनेकर यांनी रेकॉर्ड प्रस्थापित करताना शारीरिक आणि मानसिक ताकदीचे प्रदर्शन घडविले आणि कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची ताकद सूर्यनमस्कारामध्ये आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केलेले आहे. आजच्या युवापिढीने पंकज सायनेकर यांचा आदर्श घ्यावा, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
सूर्यनमस्कार हे योगाने दिलेले प्रभावी अस्त्र : श्रीपाद
यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले की योगाने जगाला सूर्यनमस्कारासारखे एक प्रभावी साधन दिले आहे. ज्या साधनाद्वारे माणसाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक समृद्धी साधणे शक्य आहे, असे निवेदन केले. तसेच पंकज सायनेकर यांचे कौतुक व अभिनंदन केले.









