डागडुजीसाठी न. पं. कर्मचारीच नाही
तुषार पेडणेकरांचा आरोप
प्रतिनिधी / देवगड:
येथील एसटी स्टॅण्डसमोरील देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या बालोद्यानाचे तौक्ते चक्रीवादळात मोठे नुकसान झाले होते. मात्र, चक्रीवादळाला महिना उलटला तरी बालोद्यानात झालेल्या पडझडीच्या डागडुजीकडे न. पं. ने डोळेझाक केली आहे. कोरोना टेस्टसाठी रस्त्यावर 15 कर्मचारी तैनात करून जनतेला व व्यापाऱयांना त्रास देणाऱया न. पं. प्रशासनाकडे बालोद्यानाच्या डागडुजीसाठी कर्मचारी नाहीत, ही शोकांतिका आहे. या बालोद्यानाची डागडुजी करून हे बालोद्यान जनतेसाठी खुले करावे. अन्यथा, शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे देवगड-जामसंडे विभागप्रमुख तुषार उर्फ पी. टी. पेडणेकर यांनी दिला आहे.
पेडणेकर यांनी रविवारी येथील बालोद्यानाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत शहरप्रमुख संतोष तारी उपस्थित होते. पेडणेकर म्हणाले, देवगड एसटी स्टॅण्डनजीक न. पं. च्यावतीने बांधण्यात आलेले बालोद्यान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. बालोद्यानानजीक शासकीय कार्यालये आहेत. कोरोनाचा काळ वगळता या बालोद्यानात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व त्यांचे पालक विरंगुळय़ासाठी येत असत. या बालोद्यानासाठी न. पं. ने दोन वर्षापूर्वी सुमारे 30 लाख रुपये खर्च केले आहेत. मात्र, या बालोद्यानाचे काम पूर्णत्वास गेले तरी बालोद्यानाचे उद्घाटन अद्याप झालेले नाही. उद्घाटनासाठी न. पं. प्रशासन कोणाची वाट पाहत आहे, असा सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.
बालोद्यान डागडुजीसाठी न. पं. कडे कर्मचारी नाही
गेल्या महिन्यात तौक्ते चक्रीवादळामुळे न. पं. बालोद्यानाचेही मोठे नुकसान झाले होते. बालोद्यानातील झाडे उन्मळून पडली आहेत. तरीही अन्य नुकसानही झाले आहे. मात्र, या पडझडीची डागडुजी अथवा दुरुस्ती करण्यासाठी न. पं. ला महिनाभर कर्मचारी मिळालेला नाही. कोरोना टेस्टसाठी न. पं. कार्यालयातील तब्बल 15 कर्मचारी रस्त्यावर तैनात ठेवून न. पं. प्रशासन व्यापाऱयांसह नागरिकांनाही नाहक त्रास देऊन दंडही ठोठावत आहे. मात्र, बोलाद्यानाच्या डागडुजीसाठी न. पं. कडे कर्मचारी नाही. ही शोकांतिका आहे, असे पेडणेकर यांनी म्हटले.
या बालोद्यानात झालेल्या पडझडीची डागडुजी लवकरात लवकर करण्यात यावी. अन्यथा, शिवसेनेच्यावतीने या बालोद्यानाची डागडुजी करून हे बालोद्यान जनतेसाठी खुले करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.









