अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार, 21 जून 2021, सकाळी 11.20
● रविवारी रात्रीच्या अहवालाचा दिलासा ● जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 7.54 टक्के ● 6,112 जणांचे नमुने तपासले ● जिल्ह्यात 2,896 बेड शिल्लक ● मृत्यू दरातही घट झाल्याचा दिलासा
सातारा / प्रतिनिधी :
एप्रिल-मे महिन्यातील पेंडिंग अहवालांची आकडेवारी भरण्यात येत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दोन हजारांच्या पटीत बाधित वाढ सुरू होती. मुंबईमध्ये सातारा जिल्ह्याच्या एकूण संख्येएवढे रुग्ण समोर येत होते. तर सातारा-मुंबईच्या बरोबरीने चाललेला होता. यामुळे जिल्ह्यातील कोरोना स्थिती गंभीर झालेली होती. मात्र जिल्ह्याची स्थिती सावरत आहे. आजपासून लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळाल्याचा दिलासा मिळत असतानाच रविवारी रात्रीच्या अहवालात फक्त 461 जणांचा अहवाल बाधित आला असल्याचा मोठा दिलासाही लाभला आहे.
अनलॉक होतानाही काळजी आवश्यकच
बाधित वाढीचा आकडा तीन अंकांवर स्थिरावला असून दीड महिन्यानंतर प्रथमच वाढ खाली घसरली आहे. दररोज आठशेच्या पटीत येत असलेल्या वाढीचा मात्र वेग मंदावला. लॉकडाऊन थोडा तरी शिथिल केल्याने थोडासा सुटकेचा निश्वास टाकला आहे. अनलॉक होतानाच खूप दिवसांनी कमी संख्येने समोर आलेली बाधीत वाढ पूर्ण थांबवण्यासाठी अनलॉक झाला असला तरी यापुढे देखील जिल्हावासियांनी कोऱोनासंदर्भातील काळजी घेत नियम पाळण्याची निश्चितपणे गरज आहे. जिल्ह्यात रिक्त बेडची संख्या वाढलेली असून यापुढे संसर्ग साखळ्या निर्माण होऊच नयेत यासाठी नागरिकांनी दक्ष राहावयास हवे.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 7.91
रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 6,112 जणांचे नमुने तपासण्यात आल्यानंतर 461 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 7.91 नमूद करण्यात आलेला आहे. गेली आठ दिवस सलगपणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर देखील दहा, नऊ टक्क्यांच्या आसपास राहिलेला होता. आता तो त्याहीपेक्षा दिलासादायकरित्या खाली आलेला आहे.
जिल्हय़ात 2,896 बेड रिक्त
आजमितीस जिल्हय़ात कोविड हॉस्पिटल्समध्ये 4,860 एकूण बेड संख्या आहे. यामध्ये प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,964 एवढी असून हॉस्पिटलमध्ये 2,896 बेड रिक्त आहेत. कोविड हॉस्पिटल्समध्ये आयसीयू व्हेंटीलेटरसह 84 बेड, आयसीयू व्हेंटिलेटरविना 238, ऑक्सिजनसह 2,035 बेड आणि ऑक्सिजनविना 539 असे 2,896 बेड रिक्त आहेत.
रविवारपर्यंत जिल्हयात एकूण नमूने 9,80,776, एकूण बाधित 1,86071, एकूण कोरोनामुक्त 1,73,293, मृत्यू 4,202, उपचारार्थ रुग्ण 9,086
रविवारी जिल्हय़ात बाधित 461, मुक्त 213, बळी 22









