62 दिवसांनी पुन्हा एसटीबस प्रवाशांच्या सेवेत,
प्रतिनिधी/ सातारा
यावर्षी लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये एसटीबसची सेवा तब्बल 62 दिवस बंद होती. बाधित रूग्णांची संख्या कमी झाल्याने सुरुवातीला 50 टक्के सेवा सुरू झाली. तोच शनिवारी जिह्यातील एसटीबसची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
जिह्यात लॉकडाऊनला शिथिलता मिळताच संपूर्ण क्षमतेने एसटीबसची सेवा सुरू झाली आहे. सातारा येथून सुटणाऱया मुंबई, पुणे, बोरिवली, ठाणे या ठिकाणी सुटणाऱया विना थांबा बसेस ही सुरू झाल्या आहेत. जिह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र ग्रामीण भागात, दुर्गम भागात सेवा अद्याप बंद आहे. ही सेवा सोमवार दि. 21 रोजी सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर एसटीबसच्या प्रत्येक फेरीनंतर बसचे सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. प्रवाशांना मास्क, सोशल डिस्टनचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख रेश्मा गाडेकर यांनी दिली.









