प्रयोग शाळेवर कामाचा ताण, कोरोनामुक्त झालेल्या विद्यार्थ्यांना ओमायक्रॉनची चिंता
प्रतिनिधी / मिरज
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना बाधित आढळलेल्या 97 विद्यार्थ्यांचा ओमायक्रॉन चाचणी अहवाल दहा दिवस उलटले तरी प्रतिक्षेतच आहे. पुणे आणि दिल्लीच्या प्रयोगशाळेत कामाचा ताण वाढल्यामुळे हा अहवाल प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. सर्व विद्यार्थी गुरूवारी कोरानातून मुक्त झाले. मात्र, प्रयोगशाळेच्या दिरंगाईमुळे ओमायक्रॉन अहवालच प्राप्त झाला नसल्याने सिव्हील प्रशासनासह वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी चिंताक्रांत आहेत.
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेणारे 97 विद्यार्थी कोरोना बाधित आढळले होते. या सर्व विद्यार्थ्यांवर मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. कोरोनाचा उत्परिवर्तीत विषाणू ओमायक्रॉन असल्याने सदर विद्यार्थ्यांच्या ओमायक्रॉन चाचणीसाठी त्यांचा स्वॅब पुणे येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी प्रयोगशाळा आणि दिल्ली येथे प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता. दहा दिवस लोटले तरीही ओमाक्रॉनचा अहवाल प्राफ्त झाला नाही, असे सिव्हील प्रशासनाकडून सांगण्यात आले.