पाच हजार रूपयांना एक बोगस प्रमाणपत्र, संशयित नितेश चोडणकरचे कारनामे
प्रतिनिधी/ पणजी
बोगस वैद्यकीय प्रमाणत्र देण्यास माहीर असलेला संशयित नितेश चोडणकर याने पणजी पोलीस स्थानकात सेवेत असताना आजारपणाच्या सुट्टीसाठी 11 बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन तब्बल 95 दिवस सुट्टी घेतली होती, असे तपासात उघड झाले आहे. इतकेच नव्हे तर संशयित बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र बनवून विकतही होता. दुसऱ्या कर्मचाऱ्यांकडून त्यासाठी तो पाच हजार रूपये आकारात असे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलीस खात्यात नोकरी करतानाच त्याचा हा एक बेकायदेशीर अतिरिक्त व्यवसाय सुरू होता.
ओल्ड गोवा पोलीस स्थानकात एलआयबी पोलीस म्हणून काम करणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलची गोवा राखीव पोलीस दलात बदली झाली होती. त्याला त्या ठिकाणी जायचे नव्हते म्हणून त्याने आजारपणाचे नाटक करून सुट्टी घेतली होती. नंतर त्याची दुसऱ्या ठिकाणी बदली होताच तो कामावर रूजू होताना बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र दिले होते. ते प्रमाणपत्रही संशयित नितेश चोडणकर याच्याकडूनच घेतल्याचे उघड झाले आहे. त्या पोलिसाचीही खात्याअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पणजी पोलिसांनी संशयिताच्या विरोधात भादंसं कलम 465, 468, 473, 471, व 420 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. राज्यातील सर्व पोलीस स्थानकांना तसेच पोलीस खात्यातील विविध विभागात अशी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र कुणी दिलेली असल्यास माहिती द्यावी म्हणून कळविले आहे. केवळ पोलीस खात्यातच नव्हे तर अन्य सरकारी खात्यातही अशी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रे देण्यात आली असावी, अशी शक्यता असून पणजी पोलीस त्याबाबतही तपास करण्याची शक्यता आहे.
अनेकवेळा पोलीस खात्यात आवडीच्या ठिकाणी बदली झाली नाही तर बदली झालेले पोलीस आजारपणाच्या सुट्टीवर जातात नंतर सुट्टीच्या काळात आमदार, मंत्र्याच्या वशिल्याने पुन्हा नव्याने बदली करून घेतात. नोकरीवर ऊजू होताना वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागते. अशावेळी अशा बोगस वैद्यकीय प्रमाणपत्राचा वापर केला जातो. पोलीस पैसे घेतात, दादागिरी करतात, आपल्या पदाचा गैरवापर करतात. पैसे घेऊन गुन्हेगारांना पाठीशी घालतात या साऱ्या प्रकारामुळे पोलीस बदनाम आहेत आणि हे सारे प्रकार सर्वसामान्य लोकांना परिचित आहेत. मात्र पोलीस बनावट वैद्यकीय दाखले तयार करतात हा प्रकार लोकांना नवीन असून पोलिसांच्या या कृत्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणात आणखी कितीतरी सरकारी कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता असल्याने ज्यांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रांचा वापर केला आहे त्यांचे धाबे दणाणले आहेत.









