22 केंद्रांवर झाले मतदान : रविवारी मतमोजणी : गतनिवडणुकीपेक्षा मतांचा टक्का वाढला : दुपारी 2 वाजेपर्यंत तब्बल 80 टक्के मतदान
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिह्यात शनिवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु असतानाही कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी (कोजिमाशि) पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी तब्बल 95.07 टक्के मतदान झाले. 8 हजार 526 सभासदांपैकी 8 हजार 106 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. कोल्हापूर येथील पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये 11 तर न्यू हायस्कूलमध्ये 11 अशा 22 केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया पार पडली. गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 90 टक्के मतदान झाले होते. यावेळी 5 टक्केहून अधिक मतदान वाढल्यामुळे सत्ताधाऱ्यांना धोक्याचा इशारा समजला जात आहे. रविवारी (10 रोजी) सकाळी 8 वाजता रमणमळा येथे मतमोजणी सुरु होणार आहे.
‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या सत्तारूढ आणि विरोधी आघाडीत चुरशीचा दुरंगी सामना होत असून 21 जागांसाठी पाच अपक्षांसह 47 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिक्षक नेते दादा लाड यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी स्वाभिमानी सहकार आघाडीच्या विरोधात आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीमध्ये चुरशीचा दुरंगी सामना झाला. 17 वर्षांहून अधिक काळ सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आमदार आसगावकर यांनी भक्कम आघाडी बांधल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या विरोधकांनी मतमोजणीपूर्वीच मतदान केंद्राबाहेर जल्लोष केला.

सकाळी 8 वाजता मतदानास सुरुवात झाली. मतदान प्रक्रिया जिल्हा पातळीवर घेतल्यामुळे सर्व 22 मतदान केंद्राबाहेर सभासदांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. त्यामुळे शनिवारी दिवसभरात मुसळधार पाऊस असतानाही दुपारी 12 वाजेपर्यंत 40 टक्के तर 2 वाजेपर्यंत तब्बल 80 टक्के मतदान झाले. त्यानंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत उर्वरित 15 टक्के मतदान झाले. चंदगडसह अन्य दुर्गम तालुक्यातील सभासद ट्रॅव्हल्समधून एकत्रित मतदान केंद्रावर आले. यामध्ये दोन्ही आघाडय़ांकडून सभासदांना मतदान स्थळापर्यंत आणण्यासाठी नेटके नियोजन केले होते. मतदान केंद्राबाहेर आघाडीचे नाव असलेल्या टोफ्या परिधान करून उमेदवार मतदारांना अभिवादन करत होते. तर आपल्या गटाकडील अजून कोणत्या सभासदाने मतदान केलेले नाही याची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला जात होता. त्यामुळेही मतदानाचा टक्का काहीअंशी वाढला.
आमदार आसगावकर, दादा लाड यांचा मतदान केंद्राबाहेर तळ
विरोधी आघाडी प्रमुख आमदार जयंत आसगावकर व सत्ताधारी आघाडी प्रमुख दादा लाड यांनी मतदान केंद्रावर सकाळपासून सायंकाळपर्यंत तळ ठोकला होता. मतदानासाठी येणाऱ्या सर्व सभासदांना अभिवादन करून आपल्याच आघाडीला मतदान करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले जात हेते. त्यामुळे सभासद कोणाला कौल देतात हे रविवारी स्पष्ट होणार आहे.
हे ही वाचा : शिराळा तालुक्यात ६७९ नागरिकांचे स्थलांतर; तहसीलदार गणेश शिंदे यांची माहिती
दोन वाजेपर्यंत निकालाचा कौल होणार स्पष्ट
रमणमळा येथे सकाळी 8 वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरु होईल. सुरुवातीस मतपत्रिकांचे विभाजन केल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरु होईल. 36 टेबल्सवर मतमोजणी होणार असून त्यासाठी 100 कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यामुळे दुपारी दीड ते दोनच्या सुमारास सर्व निकाल स्पष्ट होईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांनी दिली.









