भाजपचा आरोप, चौकशी करण्याची मागणी, इतर अनेक मतदारसंघातही हा प्रकार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
काँग्रेसने गेल्या काही दिवसापासून केंद्रीय निवडणूक आयोगावर ‘मतचोरी’चा आरोप करण्यास प्रारंभ केला आहे. आता भारतीय जनता पक्षानेही काँग्रेसवर आपल्या महत्वाच्या नेत्यांच्या मतदारसंघात मतघोटाळा करुन बनावट मतदारांची नावे मतदारसूचीत घुसविल्याचा आरोप केला आहे. प्रियांका गांधी, अखिलेश यादव आणि एम. के. स्टॅलीन यांच्या मतदारसंघांमध्ये बोगस मतदार नोंदविण्यात आले आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी केला. रायबरेली, वायनाड, कोलाथूर, डायमंड हार्बर, कन्नौज, मैनपुरी अशा मतदारसंघांमध्ये वर्षानुवर्षे बोगस मतदार घुसविले जात आहेत. हे मतदारसंघ विरोधी पक्षनेत्यांचे बालेकिल्ले आहेत. तेथे निवडणुका कशा फिरविल्या जातात, हे आता स्पष्ट होत आहे, असे प्रतिपादन अनुराग ठाकूर यांनी केले.
वायनाडमध्ये 93,000 अवैध मतदार
प्रियांका गांधी यांच्या केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात 93 हजार 499 संशयित मतदार आहेत. त्यांच्यापैकी 20 हजार डुप्लिकेट मतदार असून 17 हजार 450 मतदार बोगस पत्त्यांचे आहेत. 4 हजार 246 मतदार समान घरांमध्ये राहणारे असून 51 हजार 365 मतदारांची नावे अल्पावधीत नोंद करण्यात आली आहेत. हे सर्व प्रकार मतचोरीचे आहेत, हे विरोधी पक्षाचे नेते मान्य करतील काय, असा प्रश्नही अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेत्यांना विचारला आहे.
रायबरेलीत 2 लाख संशयित
उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी लोकसभेवर निवडले गेले आहेत. या मतदारसंघात 2 लाखांहून अधिक संशयास्पद मतदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला. त्यांच्यापैकी 19 हजार 512 डुप्लिकेट मतदार असून 71 हजार 977 मतदारांचे पत्ते बनावट आहेत. 92 हजार 747 मतदारांचा समावेश अत्यल्प काळात केला गेल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.
काँग्रेसला प्रत्युत्तर
भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात मतांची चोरी होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता भारतीय जनता पक्षानेही मोठा पलटवार काँग्रेसवर केला. भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात नव्हे, तर काँग्रेसच्या सत्ताकाळातच मतदारसूचींमध्ये सर्वाधिक हस्तक्षेप केला गेला. तसेच त्यांच्यात असंख्य बनावाट नावे घुसविण्यात आली, असे या पक्षाचे म्हणणे आहे.









