रोग नियंत्रणासाठी व्यापक जागृतीची गरज
बेळगाव : जिल्ह्यात आरोग्य खात्याकडून जनजागृती करून डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी तीन महिन्यांत 93 डेंग्यू रुग्णांची नोंद जिल्हा आरोग्य खात्याकडे झाली आहे. त्यामुळे आरोग्य खात्याकडून आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जागृतीवर भर देण्यात आला आहे. प्रस्तूत वर्षामध्ये जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत 149 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 93 रुग्ण जून 1 ते सप्टेंबर 15 या कालावधीमध्ये नोंद झाले आहेत. या तीन महिन्यांच्या कालावधीत पावसामुळे रुग्णांची संख्या वाढली असल्याचे आरोग्य खात्याकडून सांगण्यात येत आहे. रोग नियंत्रणासाठी आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये जागृती केली जात आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनही जागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात डेंग्यू नियंत्रणासाठी आरोग्य खात्याकडून अधिक परिश्रम घेण्यात येत आहेत. आरोग्य खात्याकडे आतापर्यंत 2465 रुग्णांचे रक्त संग्रहित करून तपासणी करण्यात आली आहे, असे आरोग्य खात्याकडून सांगण्यात येत आहे.
वेगवेगळे उपक्रम राबवून जागृती
पावसाचे प्रमाण कमी असल्याने नागरिक घरामध्ये तसेच बाहेर पाण्याचा साठा करत आहेत. यामुळे डेंग्यू डासांची पैदास अधिक होण्याची शक्यता आहे. यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून जागृती करत आहे.
– डॉ. एम. एस. पल्लेद (जिल्हा रोग नियंत्रणाधिकारी)









