सचिन वाघमारे / उस्मानाबाद
उस्मानाबाद येथे होत असलेले 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली असून आज 10 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रा व ग्रंथदिंडी निघणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष नितीन तावडे व प्रमुख कार्यवाह रविंद्र केसकर, कोषाध्यक्ष माधव इंगळे आदींनी दिली आहे. त्याचबरोबर आजपासून सुरू होणाऱया या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी झाली आहे.
बाहेरगावहून येणाऱया लोकांसाठी दिशादर्शक डिजीटल शहरात ठिकठिकाणी लावले आहेत. तसेच सभामंडप तसेच उद्घाटनस्थळाचीही जय्यत तयारी झाली आहे. तसेच शहरातील सर्वच शासकीय विभागाने साहित्य संमेलनासाठी रस्ते दुरूस्ती, पथदिव्यांची दुरूस्ती, स्वच्छता, संपूर्ण शहरात रंगरंगोटी करून सहकार्य केले आहे.
संमेलनाच्या ठिकाणी तीन सभा मंडप उभारले आहेत. यामध्ये शाहीर अमर शेख साहित्य मंच, सेतु माधव पगडी मंच, दत्तो आप्पाजी तुळजापूरकर साहित्य मंचाची स्वतंत्र उभारणी करण्यात आली आहे.
साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी तुळजाभवानी क्रीडा संकुलातून ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून, साहित्य संमेलनस्थळी या ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीमध्ये 25 ते 30 पथकांचा समावेश असणार आहे. या दिंडीत शहरी व ग्रामीण भागातील जवळपास दीड हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर 8 विविध लेझीम पथके, 4 झांज पथके, 2 वारकरी पथके, 9 सजीव देखावे व वेशभूषा पथके, 1 आदिवासी नृत्य पथक, ओडीसी नृत्य पथक आदींचाही यामध्ये सहभाग राहणार आहे.
आज दि. 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता संमेलनाच्या ठिकाणी ध्वजारोहण प्राचार्य कौतिकराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन सोहळा संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 3.30 ते 4. वाजण्याच्या दरम्यान तुळजापूर पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम शाहीर अमर शेख साहित्यमंचावर सादर केला जाणार आहे. तर 11 जानेवारी रोजी डॉ. दासू वैद्य व सारंग दर्शने हे प्रतिभा रानडे यांची मुलाखत घेणार आहेत. तर शालेय विद्यार्थी व शिक्षक यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, आजचे भरमसाठ कविता लेखनः बाळसं की सूज? या परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून डॉ. सुषमा करोगल या उपस्थित राहणार आहेत. तर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील जीवनजाणिवा या परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण कवठेकर हे भूषविणार आहेत.
कथाकथन या कार्यक्रमाचे सतिश तराळ हे अध्यक्ष असून एकविसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे? या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम शिधये उपस्थित राहणार आहेत. तर दि. 12 जानेवारी रोजी आजच्या लक्ष्यवेधी कथा लेखकांशी या संवाद कार्यक्रमाचे संवादक म्हणून अरविंद जगताप व राम जगताप उपस्थित राहणार आहेत. तर आजचे सामाजिक वास्तव आणि मराठी लेखक या परिसंवादाचे डॉ. हरिश्चंद्र थोरात हे अध्यक्षपद भूषविणार आहेत.
तर निमंत्रितांचे कविसंमेलन या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीकांत देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच परिचर्चा या कार्यक्रमात शेतकर्यांचा आसूडः महात्मा फुले या कार्यक्रमात आजच्या संदर्भात चर्चा करण्यात येणार असून, यावेळी डॉ. शेषराव मोहिते यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती लाभणार आहे. तर बालकुमार मेळावा (पूर्वार्ध), बालकुमार मेळावा (उत्तरार्ध) या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुरेश सावंत हे असून या दिवशीच प्रा. भास्कर चंदनशिव, लक्ष्मण शिरभाते, सुमती लांडे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच समारोपाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य रा. रं. बोराडे यांची विशेष उपस्थिती राहणार असून संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमा दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, गावकथा, संगीत देवबाभळी या नाटकाचे प्रयोग दाखविले जाणार आहेत. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त साहित्यप्रेमी, नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष नितीन तावडे, कार्यवाह रविंद्र केसकर, कोषाध्यक्ष माधव इंगळे यांनी केले आहे.









