पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवासस्थानी जात दिल्या शुभेच्छा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी रविवारी 93 वर्षांचे झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अडवाणी यांच्या निवासस्थानी जात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी चरणस्पर्श करत त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. दोन्ही दिग्गज नेत्यांदरम्यान यादरम्यान चर्चा झाली आहे. मोदींनी अडवाणींचा हात पकडून त्यांच्याकडून केक कापून घेतला तसेच दोघांनीही परस्परांना केक भरविला आहे. मोदींसोबत गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा देखील होते.
मोदींनी अडवाणींच्या भेटीची छायाचित्रे प्रसारित करत ट्विट केला आहे. अडवाणी यांच्यासोबत वेळ व्यतित करणे नेहमीच चांगले वाटते. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी त्यांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन अमूल्य आहे. देशासाठी अडवाणी यांनी मोठे योगदान दिले असल्याचे मोदींनी नमूद केले आहे.
लालकृष्ण अडवाणी हे 2002 ते 2004 यादरम्यान अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये उपपंतप्रधान राहिले आहेत. अडवाणी हे भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. 2015 मध्ये त्यांना पद्मविभूषणने गौरविण्यात आले होते.
पाकिस्तानच्या कराचीत शहरात 8 नोव्हेंबर 1927 रोजी एका हिंदू परिवारात लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म झाला होता. प्राथमिक शिक्षण कराचीच्या सेंट पॅट्रिक हायस्कुलमध्ये झाले, त्यानंतर त्यांनी हैदराबादच्या (सिंध) डीजी नॅशनल स्कुलमध्ये प्रवेश घेतला होता. फाळणीवेळी त्यांचा परिवार मुंबईत दाखल झाला होता. तेथे त्यांनी लॉ कॉलेज ऑफ द बॉम्बे युनिवर्सिटीमधून कायद्याचे शिक्षण घेतले होते.









