मिरज :
गांधी चौक ते कुपवाड रस्त्यावर नशेच्या गोळ्यांचा साठा घेऊन जाणाऱ्या चौघांना पकडून गांधी चौकी पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून नशेच्या एकूण ९२८ गोळ्या व एक दुचाकी असा एक लाख, ७२ हजार, आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला असून यातील एक अल्पवयीन आहे. नशेच्या इंजेक्शननंतर नशेच्या गोळ्यांवरही पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आरबाज उर्फ इब्राहीम रेटरेकर (२१, रा. सुभाषनगर रोड, अमननगर), अब्दूलरज्जाक अब्दूलरहिम शेख (२०, रा. आलीशान कॉलनी, मालगांव रोड) आणि उमरफारुक राजू शेख (३२, रा. बागवान गल्ली, शनिवार पेठ, मिरज) या तिघांचा समावेश आहे.तर अन्य एक संशयीत अल्पवयीन आहे.
गांधी चौकीचे पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांना गोपनीय खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण गांधी चौकी ते कुपवाड एमआयडीसी रस्त्याने नशेच्या गोळ्यांचा साठा घेऊन जात असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा लावला. एका हॉटेलजवळ संशयीतांपैकी एक तरुण दुचाकीवरुन आला. त्याच्या पाठीमागून पायी चालत अन्य दोघेजण आले. पोलिसांना संशय येताच त्यांना पकडले. तपासणीमध्ये त्यांच्याजवळ नशेच्या गोळ्यांची पाकिटे मिळाली. सदर पाकिटांमध्ये एकूण ९२८ नशेच्या गोळ्या होत्या.
पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर सदर नशेच्या गोळ्या जादा दराने विक्री करण्यासाठी साठा करून ठेवत असल्याचे संशयीतांनी सांगितले. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. नशेच्या गोळ्या आणि दुचाकी असा एक लाख, ७२ हजार, आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच गांधी चौकी पोलिसांनी नशेच्या इंजेक्शनवर जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई केली होती. या कारवाईत नशेच्या इंजेक्शन तस्करीचे सांगली-मिरज रॅकेटच उघडकीस आणले होते. आता नशेच्या गोळ्यांवरही तशाच प्रकारे कारवाई करण्यात आली आहे. गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्यांचे स्त्रोत शोधून काढण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यामध्ये नशेच्या गोळ्यांचेही रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
- मेडीकल व्यावसायिक रडारवर
संशयीतांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी विक्रीसाठी नशेच्या गोळ्या बाळगल्याचे समोर आले आहे. सदर संशयीत नशेच्या गोळ्या कुठून उपलब्ध करतात याचा शोध सुरू आहे. तपासातून काही मेडीकल चालकांचीही नावे समोर आली आहेत. नशेली पदार्थांचा बाजार चालविणारे काही मेडीकल चालकही पोलिसांच्या रडावर आहेत. इंजेक्शन तस्करी रॅकेटमध्ये औषध विक्रेत्यापासून फार्मासिटीकल डिस्ट्रीब्यूटरपर्यंत साखळी उघडकीस आली होती. आता नशेच्या गोळ्यांच्या रॅ केटमध्ये तस्करीच्या मास्टरमाईंडला पोलिसांनी शोधून काढणे गरजेचे आहे.








