शैक्षणिक, दैनंदिन कामात अडचणी : वंचित गावांची व्यथा
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यात काही शहरे व निमशहरे फाईव्ह-जी सेवा मिळवत असली तरी अद्याप 927 महसूल गावे फोर-जी इंटरनेट सेवेपासून वंचित आहेत. भारत नेट योजनेंतर्गत या गावांना वायफायचा संपर्कही मिळत नसल्याने शैक्षणिक, दैनंदिन कामात अडचणी येत आहेत.
केंद्रीय ग्रामीण विकास व सार्वजनिक संपर्क मंत्रालयाने राज्यसभेला सादर केलेल्या लेखी अहवालातून ही माहिती उपलब्ध झाली आहे. सरकारी सेवा, विविध सुविधा, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणाऱ्या बाबींचे डिजिटलायझेशन झालेले असताना आता फोर-जीचे नेटवर्क नसल्याने गावे व वसाहतीत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विविध कामांसाठी अर्ज दाखल करणे, अर्ज डाऊनलोड करणे, दैनंदिन व्यवहारासाठी युपीआयचा वापर करणे, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांना दस्तऐवज संबंधित पोर्टलवर सादर करणे या कामात अडचणी येत आहेत.
‘डिजिटल भारत’चा एक भाग म्हणून ‘डिजिटल भारत निधी’ योजनेंतर्गत देशाच्या सर्व गावांना किमान फोर-जी नेटवर्क उपलब्ध करून देण्याचे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. या उद्देशाने 2017 मध्ये योजना तयार केली होती. या योजनेचा कालावधी 2023 मध्ये पूर्ण झाला आहे. तरीही काही गावांना फोर-जी सेवा मिळालीच नाही. 927 गावे फोर-जी च्या कक्षात नसल्याची माहिती मंत्रालयाकडूनच उघड झाली आहे. बेंगळूर शहर परिसरातील 40 ते 45 कि.मी. अंतरावरील काही गावे फोर-जी पासून वंचित आहेत. बेंगळूर ग्रामीण जिल्ह्याच्या दाबसपेठ भागातील, रामनगर जिल्ह्याच्या मागडी परिसरातील काही गावेही या सेवेपासून वंचित आहेत. ही गावे उदाहरणादाखल असून एकूण 927 महसूल गावांना फोर-जी सेवा नाही.
2025 मध्ये काँग्रेस पक्षाचे पुनर्निर्माण वर्ष आहे. पक्षाने अनेक बदल घडविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गावापासून राज्यस्तरापर्यंत पदयात्रा, मेळावे, चर्चासत्रे, जनजागृती मेळावे तर एप्रिल 2025 मध्ये अखिल भारतीय काँग्रेसच्या प्रतिनिधींचा मेळावा आयोजित करण्याचे बेळगावात झालेल्या काँग्रेस अधिवेशनात जाहीर केले आहे. तत्पूर्वी सरकारने फोर-जी सेवा नसलेल्या 927 गावांना ही सेवा उपलब्ध केल्यास राज्य सरकारची निश्चितच प्रसंशा होणार आहे.
नेटवर्कबाबत तक्रार
अनेकदा युपीआयद्वारे निधी पाठवणे, घेणे यासारख्या कृती नेटवर्कच्या माध्यमातून होत असतात. पण काही गावांना फोर-जी सेवा नसल्याने महामार्गावर किंवा नजीकच्या गावात जेथे फोर-जी सेवा उपलब्ध आहे, तेथे जाऊन युपीआयचा वापर करावा लागत आहे. काही कॉलनींमध्ये फोर-जी नेटवर्क नसल्याने स्मार्टफोन, लॅपटॉप असूनही त्यांचा वापर करणे शक्य होत नाही. शेजारील गावात जाऊन फोर-जी च्या माध्यमातून म्हणजे अर्थातच नेटवर्कद्वारे अर्ज करावे लागत आहेत, अशी तक्रार फोर-जी सेवेपासून वंचित असलेल्या ग्रामस्थांची आहे.









