कोल्हापूर :
नवीन वर्षाची सुरूवात करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन करण्याची अनेक कुटुंबाची परंपरा आहे. त्यामुळे बुधवारी 91 हजार 593 भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन आपण नववर्षानिमित्त केलेले संकल्प पूर्ण करण्यासाठी शक्ती दे असे भाविकांनी साकडे घातले. बुधवारी पहाटेपासूनच अंबाबाई मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील 91 हजार 593 भाविकांनी दर्शन रांगेतून दर्शन घेतले. तर शेकडो भाविकांनी मुखदर्शन घेऊन कुटुंबाला सुखी ठेवण्याचे अंबाबाईला साकडे घातले. भाविक अंबाबाई, ज्योतिबाचे दर्शन घेत पन्हाळ्यासह इतर ठिकाणी पर्यटनासाठी निघून गेले. अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची कोल्हापुरात गर्दी असल्याने ट्राफिक जाम झाले होते. चारचाकी व दुचाकीवरून आलेल्या भाविकांनी बिंदू चौक, दसरा चौक, खानविलकर पेट्रोल पंपासह अन्य ठिकाणच्या पार्किंगमध्ये गाड्या पार्क केल्या होत्या. तर एस. टी. व रेल्वेने आलेल्या भाविकांची संख्याही जास्त असल्याने रिक्षाचालकांच्या व्यवसायात वाढ झाली. अंबाबाई मंदिर परिसरातील ओटी व पुजेचे साहित्य, प्रसादाची विक्रीही मोठया प्रमाणात झाली. रात्री उशिरापर्यंत भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येत होते. त्यामुळे दिवसभर अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती.








