जम्मू-काश्मीर पोलिसांकडून डाटा जारी : 5 पट अधिक दहशतवादी जेरबंद
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार झाल्यावर दगडफेकीच्या घटना 91 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. तर दहशतवादी आणि त्यांच्या सहाय्यकांना अटक होण्याचे प्रमाण 5 पट वाढले आहे. 2015-19 दरम्यान 4 वर्षांमध्ये 427 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. तर 2019-23 दरम्यान 2,327 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी कलम 370 हद्दपार होण्यापूर्वीचा आणि नंतरच्या 4 वर्षांमधील गुन्हेगारी घटनांचा डाटा जारी केला आहे. 2015-19 दरम्यान 329 सुरक्षा कर्मचाऱ्यांना हल्ल्यांमध्ये जीव गमवावा लागला आहे. तर 2019-23 दरम्यान 146 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच सुरक्षा कर्मचाऱ्यांमधील जीवितहानीचे प्रमाण 56 टक्क्यांनी कमी झाले आहे. केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविले होते.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी 17 निकषांवर दोन्ही कालावधींची तुलना केली आहे. यानुसार दगडफेक, ग्रेनेड स्फोट, जाळपोळ, अपहरण आणि शस्त्र हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये घट झाली आहे. याचबरोबर सुरक्षा कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक आणि दहशतवाद्यांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे.
अहवालानुसार कलम 370 हद्दपार झाल्यापासून जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था सुधारली आहे. गुन्हेगारी घटना कमी झाल्या असून सार्वजनिक सुरक्षेत सुधारणा झाली आहे. यादरम्यान गुप्तचर माहिती अधिक प्रभावीपणे मिळविण्यात आली असून दहशतवाद्यांना मदत पुरविणारी व्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यात आली आहेत.