अरकंसास येथील पोलीस अधिकारी बकशॉट स्मिथ
अमेरिकेच्या अरकंसास प्रांतातील कॅमडन शहरातील 91 वर्षीय बकशॉट स्मिथ येथील सर्वात वयोवृद्ध पोलीस कर्मचारी आहेत. या वयात देखील ते आठवडय़ातील 4 दिवस सेवा बजावतात आणि नोकरी सोडण्याचा कुठलाच विचार त्यांच्या मनात नाही. तसेही स्मिथ 10 वर्षांपूर्वीच निवृत्त झाले होते, पण कामाची आवड असल्याने निवृत्तीनंतरही ते नोकरी करत आहेत.
त्यांनी 46 वर्षांपर्यत पोलीस म्हणून नोकरी केली, निवृत्तीनंतर घरी बसणे त्यांना जमलेच नाही. कसेबसे 5 महिने घरात काढल्यावर त्यांनी पुन्हा नोकरी सुरू केली. आता ते केवळ लोकांसाठी काम करू इच्छितात. देवाची मर्जी असेल तेव्हाच निवृत्त होईन असे ते सांगतात. सर्व नियम-कायद्यांचे पालन होतेय की नाही हे ते पाहतात.
गुन्हेगारांच्या पणजोबांनाही ओळखतात
स्मिथ याचबरोबर सर्व ट्रफिक स्टॉप, पेट्रोलिंग झोन्स आणि परेडच्या स्थळांवर तैनात पोलीस कर्मचाऱयांना मदत करतात. ते पोलिसांच्या वाहनातून प्रवास करत नाहीत, पण पोलिसांचा गणवेश परिधान करतात आणि बंदूकही बाळगतात. स्मिथ हे गुन्हेगारच काय तर त्यांच्या वडिलांसह पणजोबांनाही ओळखत असल्याचे शहराचे महापौर ज्युलियन लॉट यांचे मानणे आहे.
गुन्हेगाराला अटक करून कोठडीत अनेक दिवस बसवून ठेवण्याऐवजी मी त्यांना घरी नेऊन त्यांचे मुद्दे सोडवत आलो आहे, याचमुळे अनेक गुन्हेगारांचे मनपरिवर्तन झाले आहे. हा कुठल्याही गुन्हेगारामध्ये सुधार घडवून आणण्याचा माझा मार्ग असल्याचे बकशॉट सांगतात.









