दिवस-रात्र लढतीत गुलाबी चेंडूवर दोन्ही संघांसमोर आव्हान
विराट विजयाच्या घोडदौडीसाठी प्रयत्नशील
यजमान ऑस्ट्रेलिया मागील पराभवाचा वचपा काढणार का ?
वृत्तसंस्था / ऍडलेड
जागतिक क्रिकेटमध्ये बेधडक वर्चस्व गाजवणारा विराट कोहली व त्याच्या आक्रमक शैलीमुळे संघाला मिळणारे दहा हत्तींचे बळ यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध आजपासून खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातही प्रभावशाली ठरणार का, हे येथे निश्चित होईल. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून ऍडलेड ओव्हल मैदानावर प्रारंभ होत असून भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता पहिल्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होईल.
कॅरी पॅकर यांनी सत्तरीच्या दशकात चॅनेल 9 वर दिवस-रात्र कसोटी सामन्यांची विश्व मालिका आयोजित केली होती. पण, त्यांचा हा प्रयत्न त्यावेळी सपशेल फसला. पण, 2020 च्या दशकात नव्याने दिवस-रात्र कसोटीचा प्रयोग राबवला जात असून या निमित्ताने विराट कोहलीचा करिष्मा विरुद्ध स्टीव्ह स्मिथचे सातत्य, चेतेश्वर पुजाराचे तळ ठोकून राहणे विरुद्ध लाबुशानेची फलंदाजीवरील हुकूमत, असे अनेक जुगलबंदी रंगणे अपेक्षित आहे. गोलंदाजीच्या आघाडीवर जोश हॅझलवूड विरुद्ध मोहम्मद शमी यांच्यात अधिक सरस कोण ठरेल, यावरही बरीच समीकरणे अवलंबून असतील.
ऑस्ट्रेलिया अधिक अनुभवी
एकीकडे, ऑस्ट्रेलियन संघात डेव्हिड वॉर्नर नाही तर दुसरीकडे, भारतीय संघात इशांत शर्मा नसेल. त्यामुळे, दोन्ही संघ जणू समसमान स्तरावर आले आहेत. पण, ऑस्ट्रेलियाला भारतापेक्षा अधिक दिवस-रात्र कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. शिवाय, ते घरच्या मैदानावर खेळणार आहेत. त्यामुळे, भारतीय संघासमोर अधिक दडपण असू शकते. दिवस-रात्र कसोटीत पहिल्या सत्रात फलंदाज आक्रमक असतात तर सूर्य मावळल्यानंतर फ्लडलाईटसमध्ये गोलंदाजांना अधिक अनुकूल स्थिती निर्माण होते, असा आजवरचा अनुभव आहे.
दरम्यान, विराट कोहलीने शुभमन गिल व केएल राहुल यांना संधी मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल, असे सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित आभासी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. ‘पृथ्वी शॉला कसोटी क्रिकेटमध्ये आजवर फारशी संधी मिळालेली नाही. या स्तरावर त्याचा एकदा जम बसल्यानंतर त्याची खेळी कशी बहरते, हे आम्हाला आजमावून पहायचे आहे’, असे विराट येथे म्हणाला.
स्टार्कपासून धोका?
भारताने यष्टीरक्षणासाठी वृद्धिमान साहाला पसंती दिली असून सराव सामन्यात दर्जेदार मारा करणाऱया उमेश यादवला देखील प्राधान्य मिळाले आहे. मंगळवारी सराव सत्रात थंगसरु नटराजनने भारताच्या दोन फलंदाजांना सातत्याने चकवे दिले होते. जर प्रतितास 130 किमी वेगाने नवोदित नटराजन भारतीय फलंदाजांना चकवा देत असेल तर मिशेल स्टार्कसारखा जागतिक स्तरावरील अव्वल गोलंदाज गुलाबी चेंडूने कसा करिष्मा करेल, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता भासणार नाही. अर्थात, विराट-रहाणेसारखे अव्वल फलंदाज भात्यात असताना भारतीय संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरेल आणि यामुळे उभय संघात 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत जोरदार जुगलबंदी रंगेल, हे जवळपास निश्चित आहे.
2020 या वर्षाने आपल्याला खूप काही शिकवले आहे. स्लेजिंगला उत्तर देणे किती निरर्थक असते, हे मी स्वतः यात शिकलो. त्यामुळे, मागे काय झाले, त्यावरुन त्या खेळाडूला लक्ष्य करणे, यात काहीच अर्थ वाटत नाही.
-भारतीय कर्णधार विराट कोहली
थांबा व पहा, असे आमच्या संघाचे धोरण आहे. आम्ही स्वतःहून स्लेजिंग करणार नाही. पण, गरज पडल्यास तोडीस तोड उत्तर देण्याची आमच्या संघात क्षमता आहे आणि तो पर्यायही आम्ही निश्चितपणाने अंमलात आणू.
-ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन
शुभमन गिलऐवजी पृथ्वी शॉ, ऋषभ पंतऐवजी वृद्धिमान साहाला पसंती
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताने बहरातील सलामीवीर शुभमन गिलऐवजी खराब फॉर्ममधील पृथ्वी शॉला पसंती दिली आहे. भारताचा 11 सदस्यीय संघ बुधवारीच जाहीर केला गेला. त्यात शुभमन गिल व केएल राहुल या दोघांचाही विचार झाला नसल्याचे विराटने स्पष्ट केले.
याशिवाय, यष्टीरक्षणासाठी ऋषभ पंतऐवजी वृद्धिमान साहाला पसंती मिळाली आहे. यापूर्वी सराव सामन्यात पंतने शतक झळकावले तर साहाने 50 धावांची खेळी साकारली होती. पण, साहाच्या 50 धावा अधिक प्रतिकूल स्थितीतील असल्याने त्याचा प्राधान्याने विचार झाला.
आजवर ऑस्ट्रेलियन भूमीतील भारताची कसोटीतील कामगिरी
दौरा हंगाम विजेता फरक (सामने)
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 1947-48 ऑस्ट्रेलिया 4-0 (5)
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 1967-68 ऑस्ट्रेलिया 4-0 (4)
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 1977-78 ऑस्ट्रेलिया 3-2 (5)
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 1980-81 अनिर्णीत 1-1 (3)
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 1985-86 अनिर्णीत 0-0 (3)
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 1991-92 ऑस्ट्रेलिया 4-0 (5)
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 1999-2000 ऑस्ट्रेलिया 3-0 (3)
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 2003-04 अनिर्णीत 1-1 (4)
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 2007-08 ऑस्ट्रेलिया 2-1 (4)
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 2011-12 ऑस्ट्रेलिया 4-0 (4)
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 2014-15 ऑस्ट्रेलिया 2-0 (4)
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 2018-19 भारत 2-1 (4)
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील अव्वल फलंदाज
फलंदाज कालावधी सामने धावा सर्वोच्च सरासरी शतके अर्धशतके
सचिन तेंडुलकर (भारत) 1991-2013 39 3630 241ना. 55 11 16
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) 1996-2012 29 2555 257 54.36 8 12
व्हीव्हीएस लक्ष्मण (भारत) 1998-2012 29 2434 281 49.67 6 12
राहुल द्रविड (भारत) 1996-2012 32 2143 233 39.68 2 13
मायकल क्लार्क (ऑस्ट्रेलिया) 2004-2014 22 2049 329ना. 53.92 7 6
मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया) 2001-2008 18 1888 203 59 6 8
विरेंद्र सेहवाग (भारत) 2003-2013 22 1738 195 41.38 3 9
चेतेश्वर पुजारा (भारत) 2010 पासून 16 1622 204 60.07 5 7
विराट कोहली (भारत) 2011 पासून 19 1604 169 48.6 7 4
ऍलन बोर्डर (ऑस्ट्रेलिया) 1979-1992 20 1567 163 52.23 4 9
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील अव्वल गोलंदाज
गोलंदाज कालावधी सामने बळी डावात सर्वोत्तम
अनिल कुंबळे (भारत) 1996-2008 20 111 8-141
हरभजन सिंग (भारत) 1998-2013 18 95 8-84
नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया) 2011-2019 18 85 8-50
कपिलदेव (भारत) 1979-92 20 79 8-106
रविचंद्रन अश्विन (भारत) 2011-18 15 77 7-103
झहीर खान (भारत) 2001-12 19 61 5-91
इशांत शर्मा (भारत) 2008-18 25 59 4-41
इरापल्ली प्रसन्ना (भारत) 1967-1978 13 57 6-74
रविंद्र जडेजा (भारत) 2013 पासून 10 56 6-63
एकंदरीत निकाल
संघ कालावधी सामने विजय पराभव टाय अनिर्णीत
ऑस्ट्रेलिया 1947-2019 98 42 28 1 27
भारत 1947-2019 98 28 42 1 27
संभाव्य संघ
- भारत (अंतिम संघ): विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, उमेश यादव.
- ऑस्ट्रेलिया : टीम पेन (कर्णधार व यष्टीरक्षक), जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमेरुन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हॅझलवूड, ट्रव्हिस हेड, मोईसेस हेन्रिक्यूज, मार्नस लाबुशाने, नॅथन लियॉन, मायकल नेसर, जेम्स पॅटिन्सन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ : सकाळी 9.30 पासून.