ब्रिटनमधील साराह पैनित्के नामक फ्रॉड महिलेला नऊ वर्षांनी पकडण्यात ब्रिटनच्या पोलिसांना यश आले आहे. आपल्याकडे विजय मल्ल्या किंवा मेहुल चोक्सी यांनी जशाप्रकारे घोटाळा केला आहे, तशाच प्रकारे ब्रिटिश बँकांना 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप या महिलेवर आहे. ब्रिटनमध्ये हा ‘व्हॅट’ घोटाळा म्हणून ओळखला जातो. ब्रिटनमध्ये घोटाळा करून ही महिला स्पेनमध्ये पसार झाली. तेथे नाव बदलून राहू लागली. एका स्पॅनिश माणसाबरोबर तिने विवाहही केला. अशी नऊ वर्षे गेल्यानंतर एकदा ती आपल्या कुत्र्याला फिरवित असताना पोलिसांच्या तावडीत सापडली.
त्यानंतर तिचे प्रत्यार्पण स्पेनहून ब्रिटनला करण्यात आले. स्पेनच्या न्यायालयाने आपल्या प्रत्यार्पणाविरोधात याचिका दाखल करून तिने स्वतःला वाचविण्याचा भरपूर प्रयत्न केला. तथापि, युरोपियन महासंघाच्या नियमानुसार तिला ब्रिटनच्या ताब्यात देण्यात आले. आपण इटालियन नागरिक आहोत, असा बहाणा करून या महिलेने स्पेनमध्ये प्रवेश घेतला होता. ब्रिटनमध्ये गैरमार्गाने कमावलेले पैसे तिने दोन-तीन देशांमधून फिरवत स्पेनमध्ये आणण्यात यश मिळविले होते. स्पेनमध्ये राहण्यासाठी तिने खोटे नाव धारण केले होते. तथापि, याच नावामुळे ती पकडलीही गेली. ब्रिटनमध्ये तिच्यावर अभियोग चालविण्यात आला आणि तिला आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. आपल्याला शिक्षा भोगण्यासाठी स्पेनमध्ये पाठविण्यात यावे, अशी तिची अद्यापही मागणी आहे. तथापि, तिची मागणी कनि÷ न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे.









