12 लाखांचे खत लांबविले : ग्रामीण पोलिसात एफआयआर
प्रतिनिधी /बेळगाव
देसूर रेल्वेस्थानकाजवळील गोदामातून सुमारे 12 लाख रुपये किमतीच्या रासायनिक खतांची चोरी झाली आहे. सोमवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
देसूर रेल्वेस्थानकाजवळच आरसीएफ-डीएपीचे गोदाम आहे. या गोदामात 900 पोती रासायनिक खत साठवून ठेवण्यात आले होते. गोदाम फोडून अज्ञातांनी 900 पोती खत पळविले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर व्यवस्थापक शिवाजी जाधव यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा व त्यांच्या सहकाऱयांनी गोदामाला भेट देऊन पाहणी केली. 900 पोती रासायनिक खत चोरण्यासाठी वाहनाचा वापर करण्यात आला आहे. ही चोरी कोणी केली? याचा तपास करण्यात येत आहे. गोदाम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत आहेत.
बेळगावकर हैराण रेल्वेस्थानकाजवळच गोदाम आहे. आधीच चोऱया, घरफोडय़ा, दरोडे, वाटमारीच्या प्रकारांनी बेळगावकर हैराण झाले आहेत. आता गोदाम फोडून रासायनिक खतांची पोतीही चोरण्यात आली आहेत. गोदामातून 900 पोती वाहनात भरण्यासाठी काही तास तरी लागतात. तोपर्यंत हा प्रकार कोणाच्याच लक्षात आला नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.









