सध्या त्यांची नेमणूक चंदगड पोलीस ठाण्यात आहे
कोल्हापूर : आंतरजिल्हा बदलीसाठी पोलीस शिपायांकडून 90 हजारांची खंडणी मागणाऱ्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील मुख्य लिपिकासह, महिला पोलीस कॉन्स्टेबलवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी मुख्य लिपीक संतोष मारुती पानकर (वय 47, रा. श्रीकृष्ण अपार्टमेंट, हनुमान गल्ली, कसबा बावडा) याला अटक केली.
हेडकॉन्स्टेबल धनश्री उदय जगताप (वय 45, रा. कसबा बावडा) हिच्यावर गुन्हा दाखल केला. फिर्यादी रितेश मनोहर ढहाळे (वय 31, सध्या रा. चंदगड, मूळ रा. वासाळी, नाशिक) हे पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहेत. 2022 मध्ये ते कोल्हापूर पोलीस दलात भरती झाले आहेत.
सध्या त्यांची नेमणूक चंदगड पोलीस ठाण्यात आहे. ढहाळे यांनी वडील आजारी असल्यामुळे तीन महिन्यांपूर्वी बदलीसाठी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्याकडे अर्ज केला होता. हा अर्ज गुप्ता यांनी मंजूर केला. मात्र पानकर याने हा अर्ज मंजूर झाला नसल्याचे ढहाळे यांना सांगितले.
यानंतर पानकर याने धनश्री जगतापकडून ढहाळे यांना फोन करुन बदलीचे काम करण्यासाठी 30 हजार रुपये द्यावे लागतील, असा निरोप देण्यास सांगितले. या प्रमाणे जगताप यांनी २१ तारखेला ढहाळे यांना फोन केला व पैशांची मागणी केली.
बुधवारी रात्री ढहाळे यांनी जगताप यांच्या मोबाईलवर चंदगड येथून ३० हजार रुपये ऑनलाईन पाठवले. मात्र तरीही आणखी दोन दिवस पानकर याने बदलीबाबत काहीच प्रक्रिया केली नाही. यामुळे ढहाळे यांनी याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. शुक्रवारी रात्री उशिरा याबाबतचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला. तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव करत आहेत.
आणखीन तिघांच्या तक्रारी
कोल्हापूर पोलीस दलातील आणखीन चार ते पाच पोलीस कर्मचाऱ्यांकडून पानकर याने प्रत्येकी ३० हजार रुपये स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. या पैकी आणखीन ३ कर्मचाऱ्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ढहाळे यांच्या तक्रारीमध्येच त्यांना साक्षीदार करुन घेतले आहे. आणखीन काही तक्रारदार असून त्यांचेही जबाब घेण्यात येणार आहेत.
ऑनलाईन व्यवहार
पानकर याने पोलीस हेडकॉन्स्टेबल धनश्री जगतापला ढहाळे यांना फोन करण्यास सांगितले. यानुसार जगताप हिने ढहाळे यांना फोन करून पैसे मागितले. ढहाळे यांनी ३० हजार रुपये जगतापच्या मोबाईलवर ऑनलाईन पाठवले. यानंतर ही रक्कम अशीच जगतापने पानकरच्या खात्यावर वर्ग केली.
अन्य दोन साक्षीदारांनीही अशाच प्रकारे ऑनलाईन व्यवहार केले आहेत. जगताप यांच्या खात्यावर पैसे वर्ग झाल्यानंतर काही वेळातच त्यांनी हे पैसे पानकर यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. अवघ्या काही सेकंदामध्येच जगताप यांनी हे पैसे पानकर यांना पाठविले आहे.
निलंबन शक्य
या प्रकरणाची पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी गांभीयनि दखल घेतली आहे. धनश्री जगताप आणि संतोष पानकर या दोघांचे निलंबन करण्यात येणार आहे. पानकर याला अटक करून शनिवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले, मात्र त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर झाली.
जगतापचा शोध सुरु
या प्रकरणामध्ये पहिल्यांदा धनश्री जगताप हिच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. यानंतर ते पैसे पानकर याच्या खात्यामध्ये गेले आहेत. त्यामुळे जगताप हिचा तातडीने शोध घेण्यासाठी शाहूपुरी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. राधानगरी, आणि शाहूवाडी परिसरात धनश्रीचा शोध सुरु आहे.
जगतापांचे कुटुंबच पोलीस दलात
धनश्री जगताप या चार वर्षापूर्वी पोलीस दलामध्ये भरती झाल्या आहेत. त्यांचे पहिलेच पोस्टिंग शहर वाहतूक शाखेमध्ये झाले. गेल्या सहा महिन्यांपासून त्या शहर वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. त्यांचे पतीही पोलीस दलात असून, सासूही महिला दक्षता समितीमध्ये कर्तव्यास आहेत. धनश्रीचे नाव गुन्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांना मानसिक धक्का बसला. पानकर हे मूळ राधानगरी तालुक्यातील असून धनश्री जगतापही याच तालुक्यातील असल्यामुळे या दोघांची ओळख आहे.








