गेल्या दोन वर्षातील आकडेवारी : 70 रुग्णांना दाखल केले वृद्धाश्रमात
बेळगाव : उपचाराच्या नावाखाली वृद्ध आई-वडिलांना जिल्हा रुग्णालयात सोडून देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे बिम्स प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून वृद्धांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन पुन्हा रुग्णांना त्यांच्या घरी पाठविले जात आहे. गेल्या दोन वर्षात 90 वृद्ध रुग्णांना पुन्हा नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले असून 70 जणांना वृद्धाश्रमात पाठविण्यात आले आहे. घरी पाठविण्यात आलेल्या रुग्णांपैकी 8 जण महाराष्ट्रातील, 3 जण आंध्रप्रदेश आणि प्रत्येकी 1 बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, झारखंड आणि छत्तीसगडमधील आहेत. उर्वरित 73 वृद्ध रुग्ण बेळगाव, गुलबर्गा, तुमकूर, कारवार, बागलकोट, चित्रदुर्ग, धारवाड आणि शिमोगा जिल्ह्यातील होते. यापैकी बहुतेक वृद्ध रुग्णांना त्यांच्या पाल्यांनी जाणुनबुजून सोडून दिले होते. गेल्या काही वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात वृद्ध रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांना दाखल करत असताना चुकीची माहिती बिम्सला दिली जात आहे.
ओळखपत्रांची पडताळणी
अॅडमिट केल्यानंतर पुन्हा संबंधित रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयाकडे फिरकत नसल्याने तशा रुग्णांची काळजी बिम्स प्रशासनालाच घ्यावी लागत आहे. त्यामुळे मध्यंतरी जिल्हा रुग्णालय वृद्धाश्रम बनले असल्याची टीका प्रसार माध्यमांतून करण्यात आली. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेत दाखल करण्यात आलेल्या वृद्ध रुग्णांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम बिम्सकडून हाती घेण्यात आले आहे. रुग्णांना दाखल करताना नातेवाईकांनी दिलेल्या ओळखपत्रांची पडताळणी करण्यासह पोलीस खात्याची मदतही घेतली जात आहे.
जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णांना मोफत उपचार तसेच तीन वेळचे जेवण दिले जाते. त्यामुळे उपचाराच्या नावाखाली काही नातेवाईकांकडून वृद्धांची देखभाल करण्याऐवजी त्यांना जिल्हा रुग्णालयात सोडून दिले जात आहे. त्यामुळे आता वृद्ध रुग्णांना दाखल करून घेण्यापूर्वी दाखल करणाऱ्यांचे ओळखपत्र विचारले जात आहे. देण्यात आलेले ओळखपत्र खरे आहे की नाही याची पडताळणी केली जात आहे. त्यानंतरच रुग्णांना अॅडमिट केले जात आहे. विशेषकरून अशा प्रकारच्या रुग्णांना आपत्कालीन विभागातून अॅडमिट केले जात आहे.









