भाजण्यासाठी रचलेल्या भट्यांचे पावसामुळे अतोनात नुकसान
उंब्रज : मे महिन्यात सुमारे दहा दिवस झालेल्या मुसळधार पावसाने उंब्रज विभागातील वीट भट्टी व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. परिसरातील सुमारे 90 वीटभट्टींचे तीन कोटींवर नुकसान झाले आहे. यामुळे वीटभट्टी चालक-मालक हाताश झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे हे नुकसान भरून कसे काढायचे हा प्रश्न वीट व्यावसायिकांसमोर उभा झाला आहे.
भाजण्यासाठी रचलेल्या भट्यांचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले असून नवीन वीट तयार करण्याचे काम थांबल्यानेही कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. अस्मानी संकटनाने अनेक वीट व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले. वीटभट्टी व्यवसायात अनेक नवीन व्यावसायिक बँकाना घरे, शेती तारण ठेवून लाखोंचे कर्ज घेवून व्यवसायात उतरतात. पंरतु पावसाने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून नेला आहे.
उंब्रज, वडोली भिकेश्वर, कोर्टी, भोसलेवाडी, शिवडे हद्दीत वीटभट्टींचे कोट्यावधींचे नुकसान आहे. वीट व्यावसायिक विजय जाधव यांचे १५ लाख, हरिश्चंद्र कुराडे १० लाख, धनाजी बागल ८ लाख, विनायक जाधव १५ लाख, सजीन माने १० लाख, सचिन कदम १५ लाख, सचिन साळुंखे ७ लाख, गुंडीराव केदार ८ लाख, अरविंद थोरात २० लाख, बाबासो जाधव १० लाख तसेच अर्जुन राठोड, नानासो चव्हाण अशा ९० हून अधिक वीट व्यावसायिकांचे प्रत्येकी नुकसान लाखोंच्या घरात आहे. महसूल प्रशासनाने या अस्मानी संकटातून वीट व्यवसायिकांना हातभार लावण्यासाठी व पुन्हा उभा राहण्यासाठी नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी वीट व्यावसायिकांकडून होत आहे.








