रकीबुल हसनला जन्मठेप : मुस्ताकला 15 तर कौशल राणीला 10 वर्षांची शिक्षा
वृत्तसंस्था /रांची
राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेव प्रकरणात सीबीआय न्यायालयाने 9 वर्षानंतर दोषींना शिक्षा सुनावली आहे. लव्ह जिहादच्या या प्रसिद्ध प्रकरणात आरोपी रकीबुल हसन उर्फ रणजित सिंह कोहली, मुस्ताक अहमद आणि कौशल राणी यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने स्वतंत्रपणे शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने रकीबुल उर्फ रणजित सिंग कोहलीला जन्मठेपेची, मुस्ताक अहमदला 15 वर्षांची आणि कौशल राणीला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच सर्वांना प्रत्येकी 50 हजार ऊपयांचा दंडही भरावा लागणार आहे. तारा शाहदेव प्रकरण झारखंडमध्ये 2014 पासून चर्चेत होते. यापूर्वी झारखंड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2015 मध्ये हे प्रकरण सीबीआयने ताब्यात घेतले. 2017 मध्ये या तिघांविऊद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तारा शाहदेव प्रकरणात 30 सप्टेंबर रोजी विशेष सीबीआय न्यायालयात तिन्ही आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर शिक्षा सुनावण्यासाठी गुरुवार, 5 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने गुरुवारी तिन्ही आरोपींना शिक्षा सुनावली. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर पीडित तारा शाहदेवने आपण शिक्षेवर समाधानी असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, याप्रकरणी रणजित सिंग यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता हे प्रकरण आता वरिष्ठ न्यायालयात पोहोचण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.









