वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या नऊ वर्षीय आरित कपिलने एका आघाडीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर झालेल्या ‘अर्ली टायटल्ड ट्युजडे’ बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखून सर्वांना चकीत केले. महत्त्वाचे म्हणजे हा सामना बरोबरीत सुटण्यापूर्वी आरित कार्लसनला हरवण्याच्या जवळ पोहोचला होता.
नुकत्याच झालेल्या 9 वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या आरितने पाच वेळच्या विश्वविजेत्याला तोडीस तोड चाली केल्या आणि कार्लसनला पूर्णपणे सामना गमावण्याच्या स्थितीत आणले. परंतु वेळ संपत आलेली असताना आणि घड्याळात फक्त काही सेकंद शिल्लक असताना या भारतीय मुलाला त्याचा फायदा रूपांतरित करता आला नाही आणि अखेर एंडगेममध्ये बरोबरी साधणे भाग पडले. आरित जॉर्जियातील त्याच्या हॉटेलमधून हा सामना खेळला. तो सध्या 10 वर्षांखालील विश्वचषकात पदक प्राप्तीसाठी झुंजत आहे.
आरितने पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये विजय मिळवले आहेत. दरम्यान, भारताच्या व्ही. प्रणवने 11 पैकी 10 गुणांसह ‘अर्ली टायटल्ड ट्युजडे’चे विजेतेपद पटकावले. अमेरिकन ग्रँडमास्टर हान्स मोके निमन आणि कार्लसन या दोघांनीही 9.5 गुण मिळविले, परंतु निमनने टायब्रेकमध्ये दुसरे स्थान मिळवले.









