महिलेसह तिघांना अटक : मुडलगी पोलिसांची कारवाई
बेळगाव : खासगी क्षणातील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मुडलगी नगरपरिषदेच्या सदस्याकडून पैसे उकळणाऱ्या एका महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल पैलवान त्याचा मित्र सुबानी आणि रेश्मा कबडीशिवापूर अशी अटकेतील संशयिताची नावे आहेत. पैसे उकळण्याच्या उद्देशाने महिलेने मुडलगी नगर परिषदेच्या एका सदस्यासोबत सलगी केली. त्यानंतर दोघांचे खासगीतील व्हिडीओ टिपण्यात आले. सदर व्हिडीओ ठेवून घेऊन नगरपरिषदेच्या सदस्याकडे दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी देण्यात आल्याने घाबरलेल्या नगरसेवकांने संबंधितांना 9 लाख रुपये दिले. त्यानंतर उर्वरित एक लाख रुपयांसाठी पुन्हा नगरसेवकांकडे तगादा लावण्यात आला. त्यामुळे त्रिकूटाच्या त्रासाला कंटाळून नगरसेवकाने 7 डिसेंबर रोजी मुडलगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी वरील तिघांना अटक केली.









