महिला-बाल कल्याण खात्याच्या अधिकारी रेवती होसमठ यांची माहिती : सप्टेंबरमधील निधी वाटप : नवीन अर्ज स्वीकृती सुरू
बेळगाव : महिलांसाठी महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गृहलक्ष्मी योजनेतील सप्टेंबर महिन्यातील रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्यात 9 लाख 6 हजार 157 लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. उर्वरितांसाठी रक्कम वितरणाची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती महिला व बाल कल्याण खात्याच्या अधिकारी रेवती होसमठ यांनी दिली आहे. सरकारने पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली आहे. यापैकी गृहलक्ष्मी योजनेला ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे. ऑगस्ट महिन्याचा निधी मिळाला होता. मात्र सप्टेंबर महिन्यातील निधीला विलंब झाला होता. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र सप्टेंबरचा निधी ऑक्टोबर अखेरीस लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. सरकारने पाच गॅरंटी योजनांमध्ये गृहलक्ष्मी योजना लागू केली आहे. या अंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेला मासिक 2 हजार रुपये दिले जात आहेत. यासाठी जून महिन्यापासून अर्ज स्वीकृती सुरू करण्यात आली होती. जुलै दरम्यान 11 लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 2 लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली नव्हती. आता सप्टेंबर महिन्याचा निधी एक महिना उशिराने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जात आहे. मात्र सप्टेंबर महिन्यातील लाभार्थ्यांना रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे लाभार्थी प्रतीक्षेत आहेत.
नवीन अर्ज स्वीकृती सुरू
गृहलक्ष्मीसाठी नवीन अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. ग्रामवन, कर्नाटक वन आणि बेळगाव वनमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. मात्र नावात बदल, लाभार्थी बदल आदी कामे असल्यास नाकारली जात आहेत. गृहलक्ष्मी योजना सुरू होऊन तीन महिने उलटले तरी अद्याप बरेच लाभार्थी वंचित असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. ऑनलाईन अडचणी, कागदपत्रांचा अभाव आणि बँकेतील डीबीटीच्या समस्येमुळे या योजनेपासून अनेकांना वंचित रहावे लागले आहे. याबाबत बँकेत चौकशी केली असता महिला व बाल कल्याण खात्याकडे बोट दाखविले जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत.









