कोल्हापूर / विनोद सावंत :
राज्य शासनाने अन्न सुरक्षा योजनेतील सर्व शिधाधारकांना ‘ई’ केवायसी करणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यामध्ये अद्यपी 9 लाख 16 हजार लाभार्थ्यांनी ‘ई’ केवायसी केलेली नाही. 28 फेब्रुवारीपर्यंत केवायसी देण्याची मुदत आहे. यानंतर मात्र, मुदत मिळणे अशक्य असून संबंधितांचे धान्य बंद होण्याची दाट शक्यत आहे.
सर्व शिधावाटप दुकानामध्ये ई–पॉस मशीनवर आधार प्रमाणिकरण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शिधापत्रिका सोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकेमध्ये नमुद असलेल्या व्यक्ती त्याच आहेत, याची खात्री करण्यासाठी आधार प्रमाणिकरण (ई– केवायसी) होणे आवश्यक आहे. त्याआधारे शिधापत्रिकेमध्ये योग्य व्यक्ती असल्याची खात्री होणार आहे. त्यामुळे राज्यशासनाने राज्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना ई केवायसी बंधनकारक केली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासनाने शिधापत्रिका धारकांना पुरवठा विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे. परंतू काही शिधापत्रिका धारकाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पुन्हा पुरवठा विभागाने अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी धान्य घेतेवेळी कुटुंबातील सर्व सदस्यांसह नजिकच्या रास्तभाव दुकानातून 28 फेब्रुवारी 2025 अखेर आधार प्रमाणिकरण (ई–केवायसी) पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन केले आहे. यानंतर मुदत वाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. ज्यांची ई केवायसी नसणार अशा लाभार्थ्यांचे मोफतचे धान्य बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महिन्यांत ई केवायसी करणे आवश्यक आहे.
जिह्यात एकूण 1 हजार 685 रास्तभाव धान्य दुकाने असून अन्नसुरक्षा लाभार्थी योजनेअंतर्गत जिह्यामध्ये अंत्योदय योजनेच्या 51 हजार 811 व प्राधान्य कुटुंब योजनेचे एकूण 5 लाख 35 हजार 425 शिधापत्रिकाधारक आहेत. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजना या दोन्हीची एकूण लाभार्थी संख्या 25 लाख 13 हजार 882 आहे. जिह्यामध्ये प्रतिमाह सरासरी 98 टक्के धान्य उचल होत असून सर्व लाभार्थ्यांचे आधार क्रमांक शिधापत्रिकेसोबत संलग्न करण्यात आले आहेत. तथापि काही शिधापत्रिकाधारकांचे आधार प्रमाणिकरण (ई–केवायसी) अत्यल्प असून अद्यापही 9 लाख 16 हजार 701 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. या लाभार्थ्यांनी जर महिन्यां ई केवायसी केली नाही तर पुढील महिन्यांपासून त्यांचे धान्य बंद होण्याची दाट शक्यता आहे.
- रेशनच्या सर्व दुकानात ‘ई’ केवायसी सुविधा
सर्व रास्तभाव दुकानामध्ये आधार प्रमाणीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आधार प्रमाणिकरण करण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही, तसेच कोणत्याही रास्तभाव धान्य दुकानातुन आधार प्रमाणिकरण (ई–केवायसी) करता येणार आहे. आधार प्रमाणिकरण (ई–केवायसी) न केल्यास भविष्यामध्ये अन्नसुरक्षा योजनेचा लाभ बंद होण्याची शक्यता असल्याचेही श्रीमती चव्हाण यांनी पत्रकाव्दारे कळविले आ
- काहींसाठी ‘ई’ केवायसी बनली डोकेदुखी
काही ज्येष्ठ नागरिकांच्या हाताचे ठसे स्पष्ट नसल्याने आधार प्रमाणिकरण होत नाही. आधार प्रमाणिकरण केल्यानंतर पॉस मशिनमध्ये ठसा देताना प्रक्रिया पूर्ण होत नाही. अशा लाभार्थ्यांना ई केवायसी डोकेदुखीची बनली आहे.
- सर्व्हर डाऊन, केवायसी कशी करायची?
वारंवार ऑनलाईन सर्व्हर बंद पडत असल्याने रेशन दुकानांमध्ये केवायसी करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. पूर्वी झालेल्या केवायसी पॉस मशिनवर दिसत नाही. त्यामुळे 28 फेब्रुवारीपर्यंत शिल्लक लाभार्थ्यांच्या केवायसी कशा पूर्ण होणार असा सवाल रेशन दुकानदारांकडून उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात रेशनची दुकाने -1 हजार 685
अंत्योदय योजनेचे शिधापत्रिका धारक -51 हजार 811
प्राधान्य कुटुंब योजनेचे शिधापत्रिकाधारक– 5 लाख 35 हजार 425
अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थी -25 लाख 13 हजार 882
‘अन्नसुरक्षा’चे प्रति महिना धान्य उचल-98 टक्के
- ‘ई’ केवायसी 28 फेब्रुवारी पर्यंत करा
गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील रेशनच्या लाभार्थ्यांना ई केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे. 31 डिसेंबर असणारी मुदतीमध्ये वाढ केली आहे. 28 फेब्रुवारी अंतिम मुदत आहे. या दरम्यान ई केवायसी केली नाही तर मात्र, संबंधितांचे धान्य बंद होऊ शकते.
मोहिनी चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर








