वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
आंध्रप्रदेशच्या अन्नामय्या जिल्ह्यात आंब्याची वाहतूक करणारा ट्रक दुर्घटनाग्रस्त झाला आहे. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. रे•ाrचेरुवु नजीक ट्रक उलटल्याने 9 जणांचा मृत्यू झाला असून अन्य 12 जण जखमी झाले आहेत. आंब्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून 20 पेक्षा अधिक जण प्रवास करत होते. ही दुर्घटना रविवारी रात्री उशिरा घडल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे.
12 जखमींपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. या गंभीर जखमींना कडप्पा येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक व्ही. विद्यासागर नायडू यांनी दिली आहे. भरधाव वेगामुळे चालकाने ट्रकवरील नियंत्रण गमाविले होते, असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. तसेच दुर्घटनेच्या कारणांसंबंधी अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती जाणून घेतली. राज्य सरकार पीडित परिवारांना पूर्ण मदत करणार असल्याचे आश्वासन चंद्राबाबू यांनी दिले आहे. राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांनीही दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. या दु:खद दुर्घटनेत लोकांच्या मृत्युमुळे मोठे दु:ख झाले. मृतांच्या परिवाराबद्दल संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करत असल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे.









