वृत्तसंस्था/बिकानेर
राजस्थानमधील बिकानेर येथील बाजारपेठेत झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला. बुधवारी घडलेल्या या दुर्घटनेत बचावाकार्यादरम्यान चार मृतदेह सापडले होते. त्यानंतर गुरुवारी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आणखी पाच मृतदेह बाहेर काढल्यामुळे मृतांची संख्या 9 झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहरातील मदन बाजार परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने इमारतीचे दोन मजले कोसळले. तसेच आजुबाजुच्या दुकानांचीही हानी झाली आहे. या बाजारातील सर्व दुकानांमध्ये दागिने बनवण्याचे काम केले जाते. गॅस सिलिंडर स्फोटाच्या दुर्घटनेत अनेक दुकानांचे नुकसान झाले असून लाखो रुपयांचे सोने ढिगाऱ्याखाली गाडल्याची माहिती दुकानदारांनी दिली. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला.









