प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या 9 विदेशी नागरिकांना अटक केली आहे. सीसीबी पोलिसांनी मंगळवारी सदर कारवाई केली आहे. यामध्ये चार नायजेरियन, दोन घाना आणि एका सुदानी नागरिकासह एकूण 9 जणांचा समावेश आहे. सर्वजणांचे पासपोर्ट आणि व्हिसाची मुदत संपली असतानाही ते शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत होते. अटक केलेल्या व्यक्तींना डिटेंशन सेंटरमध्ये पाठवण्यात आले असून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षण आणि इतर कारणांसाठी बेंगळूरमध्ये आलेल्या आणि व्हिसाची मुदत संपली असतानाही येथे वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांचा शोध घेणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे शहर पोलिसांसाठी एक आव्हानात्मक काम आहे. असे असतानाही बेंगळूर पोलीस विदेशी नागरिकांचा शोध घेत आहेत.









