टँकर-टेम्पोची समोरा-समोर टक्कर
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारची राजधानी पाटण्यात शनिवारी सकाळी झालेल्या एका भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला. या भीषण रस्ता दुर्घटनेत एकूण 9 भाविकांचा मृत्यू झाला आहे. शाहजहांपूर पोलीस स्टेशन परिसरातील अल्ट्राटेक सिमेंट फॅक्टरीच्या जवळ एका हायस्पीड टँकर आणि टेम्पोमध्ये झालेल्या भीषण टक्करमध्ये आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले होते. जखमींना रुग्णालयात हलवल्यानंतर उपचारादरम्यान अन्य एकाचा मृत्यू झाला. तिघांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. हा अपघात इतका भयानक होता की टेम्पोचा चक्काचूर झाला होता. तसेच मृतदेह रस्त्यावर विखुरले गेले होते.
अपघातातील सर्व मृत आणि जखमी हे नालंदा जिह्यातील हिलसा पोलीस स्टेशन परिसरातील मालवा गावातील रहिवासी होते. ते भादो अमावस्येनिमित्त गंगा नदीत स्नान करण्यासाठी गेले होते. गंगा स्नानावरून परतताना हा दुर्दैवी अपघात घडला. घटनेनंतर स्थानिक लोकांनी मदतकार्य केले. वेगवान टँकरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पोला धडकल्यानंतर हा भीषण अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच शाहजहांपूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी-अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी टँकरचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









