हुबळीच्या साईनगरातील घटना : जखमींवर किम्समध्ये उपचार सुरू
प्रतिनिधी/ बेळगाव
गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने 9 अय्यप्पा स्वामी भक्त गंभीर जखमी झाल्याची घटना हुबळीच्या साईनगरातील अच्चव्वन वसाहतीमध्ये सोमवारी पहाटे घडली. या घटनेमुळे साईनगरचा परिसर हादरून गेला आहे. विनायक बारकेर (वय 12), प्रकाश बारकेर (वय 42), तेजस सात्री (वय 26), शंकर रायनगौड्र (वय 29), प्रवीण चलवादी (वय 24), अज्जास्वामी (वय 58), राजू हर्लापूर (वय 21), संजय सौदत्ती (वय 20) व मंजुनाथ तोरद (वय 22) अशी जखमींची नावे असून उपचारासाठी त्यांना हुबळीच्या कर्नाटक वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात (किम्स) दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी, मागील पाच-सहा वर्षांपासून अच्चव्वन वसाहतीत एका मंदिरात अय्यप्पा स्वामींच्या भक्तांचे व्रत सुरू आहे. यंदाही तेथील 9 ते 10 जणांनी व्रत केले आहे. यंदा 14 जणांनी माला धारण करून एका मंदिरातील एक खोलीमध्ये अय्यप्पा स्वामींचे प्रतिमा पूजन, भजन करीत आहेत. रविवारी रात्री महापूजा भजन आटोपून भक्त मंदिरातील माळ्यावर झोपले होते. भाविकापैकी एका भक्ताचा झोपेतच असताना गॅस सिलिंडरवर पाय पडला. त्यामुळे सिलिंडर कलंडून त्याचे रेग्युलेटरही निसटले. सिलिंडर गडगडत जाऊन अय्यप्पा स्वामींची प्रतिमा पूजन केलेल्या ठिकाणी एका निरांजनावर जाऊन धडकला. निरांजनची ज्योत सिलिंडरला लागल्याने काही क्षणातच सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये 9 भाविक जखमी झाले. किम्समध्ये विशेष तज्ञांकडून जखमींवर उपचार सुरू आहेत.









