एकूण अर्जांची संख्या 21. उमेदवारांमध्ये निश्चितीसाठी चर्चा सुरूच.
डिचोली / प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयातील 17 पंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज स्विकारण्याच्या काल बुधवारी (दि. 20) तिसऱया दिवशी 9 उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक अधिकाऱयांकडे सादर केले. त्यामुळे एकूण अर्जांची संख्या 21 इतकी झाली आहे.
पिळगाव पंचायतीच्या प्रभाग क्र. 1 मध्ये सुनील जयदेव वायंगणकर यांंनी आपला अर्ज दाखल केला. साळ पंचायतीच्या प्रभाग क्र. 1 मध्ये प्रिया हरिश्चंद्र परवार यांनी अर्ज सादर केला. शिरगाव पंचायतीच्या प्रभाग क्र. 2 मध्ये शमा शांबा बेतकर यांनी अर्ज सादर केला.
लाटंबार्से पंचायतीच्या प्रभाग क्र. 2 मध्ये दिपक तुकाराम गावस, प्रभाग क्र. 4 मध्ये राधा कृष्णा माटणेकर, प्रभाग क्र. 7 मध्ये बाबासाहेब कृष्णराव राणे, प्रभाग क्र. 9 मध्ये त्रीशा कृष्णराव राणे यांंनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले. वन म्हावळींगे कुडचिरे पंचायतीच्या प्रभाग क्र. 1 मध्ये तुळशीदास दत्ताराम चिबडे यांनी उमेदवारी अर्ज मामलेदार तथा निवडणूक अधिकारी लक्ष्मीकांत कुट्टीकर यांच्याकडे सादर केला.
साखळी मतदारसंघातील पाळी कोठंबी या पंचायतीच्या प्रभाग क्र. 3 मध्ये दिपक विठोबा नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी तथा संयुक्त मामलेदार अपूर्वा कर्पे यांच्याकडे सादर केला. साखळी मतदारसंघातील सहा पंचायतींमधून पहिला उमेदवारी अर्ज सादर करण्याचा मान पाळ कोठंबी पंचायतींचे प्रभाग तीनचे उमेदवार दिपक नाईक यांनी मिळविला आहे. या मतदारसंघातील सहाही पंचायतींमधून एकच अर्ज सोडल्यास अद्याप एकही उमेदवारी अर्ज आलेला नाही.
निवडणुकीचे गांभीर्य ओळखून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडूनही चांगलीच व्युहरचना बांधली जात आहे. अजूनही काही पंचायतींच्या काही प्रभागांमध्ये उमेदवार निश्चित होण्यास विलंब लागत आहे. काही पंचायतींमधील प्रभाग आरक्षणामुळे उमेदवारांची चाचपणीच सुरू आहे. त्यामुळे अद्याप उमेदवार मिळणे दुरापास्त झाले आहे. आरक्षणाप्रमाणे काही राजकीय नेते चांगल्या उमेदवारांची उमेदवारी भरावी यासाठी मनधरणी करण्यात गुंतले आहेत.
कारापूर सर्वण पंचायतीच्या सर्वण या गावातील प्रभाग ओबीसी राखीव करण्यात आला आहे. या गावात ओबीसी मतदारांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे. तरीही हा प्रभाग ओबीसी करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रभागात याच गावातील किंवा प्रभागातील उमेदवाराल उतरण्यची संधी मिळू शकत नसल्याने बाहेरून उमेदवार आयात करण्याची पाळी गावातील नेत्यांवर येणार आहे. या प्रकारामुळे गावात मात्र नाराजी पसरली आहे. असे प्रकार इतरही पंचायतींच्या काही प्रभागांमध्ये घडलेले असल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकारांमुळे कधी राजकारणाशी आणि समाजकारणाशीही संबंध नसलेल्या काही व्यक्तींना मात्र उमेदवार म्हणून लोकांसमोर जाण्याची संधी प्राप्त झाली आहे.









