काहीसा दिलासा : लम्पी नुकसानग्रस्तांना मदत, पाच हजार शेतकऱ्यांना मिळाली भरपाई
प्रतिनिधी /बेळगाव
‘लम्पी’ रोगाने दगावलेल्या जनावर मालकांच्या बँक खात्यात 9 कोटी 13 लाख 85 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात ही नुकसानभरपाई दिली गेली आहे. उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनादेखील तात्काळ भरपाई दिली जाणार आहे, अशी माहिती पशुसंगोपनने दिली आहे.
लम्पी विषाणूजन्य रोगाने जिल्ह्यातील 7 हजारांहून अधिक जनावरे दगावली आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात काही नुकसानग्रस्तांना मदत मिळाली तर आता दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील 5004 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. त्यामुळे ‘लम्पी’च्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. लम्पीने दगावलेल्या बैलासाठी 30, गायीसाठी 20 आणि वासरासाठी 5 हजार रुपये मदत दिली जात आहे.
पशुसंगोपनकडे मनुष्यबळ कमी पडत असल्याने अडचण
आतापर्यंत 42225 जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे 7000 अधिक जनावरे दगावली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान अशा परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत दिली जात आहे. मात्र अद्यापही बऱ्याच जनावरांना लम्पीची लागण सुरू आहे. त्यामुळे उपचारासाठी शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पशुसंगोपनकडून वेळेत उपचार मिळत नसल्याने शेतकऱ्यांना खासगी
डॉक्टरांचाच आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. पशुसंगोपनकडे मनुष्यबळ कमी पडत असल्याने शेतकऱ्यांपर्यंत सोयी-सुविधा आणि उपचार करताना अडचणी येऊ लागल्या आहेत.
तुटपुंजी मदत मिळत असल्याने नाराजी
जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. काही भागात पुन्हा दुसऱ्या टप्प्यात लम्पीची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर चिंता वाढली आहे. लम्पीने दगावलेल्या जनावरांसाठी शासनाकडून केवळ तुटपुंजी मदत दिली जात आहे. जनावरांच्या किंमती 70 ते 80 हजार रुपये आहेत. त्या तुलनेत केवळ शासनाकडून 20 ते 30 हजार रुपये मदत दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
उर्वरितांनाही तात्काळ मदत
जिल्ह्यातील 5000 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावावर 9 कोटी 13 लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. उर्वरित नुकसानग्रस्तांनादेखील तात्काळ मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात ही मदत जमा केली जात आहे.
– डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक पशुसंगोपन)









