नासा स्पेसएक्स प्रक्षेपण : स्वतःच्या भूमीतून पाठविले अंतराळवीर
फ्लोरिडा / वृत्तसंस्था
अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने 9 वर्षांनी इतिहास रचला आहे. फ्लोरिडाच्या केप कनवरलमध्ये जॉन एफ केनेडी अंतराळ केंद्रातून नासा-स्पेसएक्स डेमो-2 मिशन यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आली आहे. अमेरिकेने 9 वर्षांमध्ये पहिल्यांदा च स्वतःच्या भूमीवरून अंतराळात अंतराळवीर पाठविले आहेत. नासाचे प्रशासक जिम ब्राइडेनस्टीन यांनी प्रक्षेपणासंबंधी माहिती दिली आहे.
9 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आम्ही अमेरिकेच्या अंतराळवीराला स्वदेशी प्रक्षेपकाद्वारे अमेरिकेच्या भूमीवरून पाठविले आहे. हा क्षण पाहण्याची संधी दिलेल्या नासा आणि स्पेसएक्सच्या पथकाबद्दल गर्व वाटतो. स्वतःच्या अंतराळवीरांना या प्रक्षेपकात (फाल्कन 9) हा एक अत्यंत वेगळय़ा प्रकारचा अनुभव आहे. हे ‘लाँच अमेरिका’ असल्याचे उद्गार ब्राइडेनस्टीन यांनी काढले आहेत.
अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजून 22 मिनिटांनी फाल्कन 9 चे प्रक्षेपण पार पडले आहे. दोन्ही अंतराळवीर पूर्ण सज्जतेने स्पेसएक्सच्या प्रक्षेपकात दाखल झाले. काउंटडाउन संपुष्टात आल्यावर अंतराळयान झेपावल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तत्पूर्वी बुधवारी खराब हवामानामुळे प्रक्षेपण निर्धारित वेळेच्या 16 मिनिटांपूर्वी रोखण्यात आले होते.
नासासाठी ऐतिहासिक क्षण
ऍलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या प्रक्षेपकाने रॉबर्ट बेहनकेन आणि डगलस हर्ले यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचविले आहे. दोन्ही अंतराळवीर 19 तासांच्या प्रवासानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले आहेत. 2011 मध्ये स्पेस शटल कार्यक्रम संपुष्टात आल्यावर पहिल्यांदाच अमेरिकेचे अंतराळवीर मायदेशातूनच अंतराळासाठी रवाना करण्यात आले आहेत. आतापर्यंत रशियाच्या सोयूजची मदत घेतली जात होती. कुठल्याही खासगी कंपनीच्या प्रक्षेपकाद्वारे अंतराळमोहीम राबविली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जगाचे लागले होते लक्ष
अमेरिकेच्या इतिहासात नासाने मंगळ मोहिमेसह अनेक महत्त्वाचे विक्रम जॉन एफ केनेडी अंतराळ केंद्राच्या माध्यमातून स्वतःच्या नावावर नोंदविले आहेत. परंतु 2011 नंतर या कामगिरीला ब्रेक लागला होता. अमेरिकेचे अंतराळवीर रशियाच्या मदतीने अंतराळात जात राहिले आहेत. परंतु आता नासाने पुन्हा एकदा अमेरिकेच्या भूमीवरून स्वतःच्या अंतराळवीरांना स्वदेशी प्रक्षेपकात बसवून अंतराळात पाठविले आहे. पूर्ण जगाच्या नजरा या मोहिमेवर केंद्रीत झाल्या होत्या.









