ऑनलाईन टीम / किव्ह :
रशिया आणि युक्रेनमध्ये मागील महिनाभरापासून युद्ध सुरू आहे. या युद्धाची धग दिवसेंदिवस तीव्र होत आहे. रशिया युक्रेनच्या वेगवेगळ्या शहरांना लक्ष्य करत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकही या युद्धाचे शिकार बनत आहेत. दरम्यान, दोन्ही देशातील हे युद्ध 9 मे पर्यंत संपलं पाहिजे, असे आदेश रशियन सैन्याला देण्यात आल्याचा दावा युक्रेनच्या लष्कराने केला आहे.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे सध्या संपूर्ण जगावर चिंतेचं वातावरण आहे. अनेक देशांनी रशियावर निर्बंध लावले आहेत. अपवाद वगळता संयुक्त राष्ट्रांनीही रशियाचे समर्थन करण्यास नकार दिला आहे. तरी देखील रशिया युद्धातून माघार घेण्यास तयार नाही. त्यामुळे युक्रेनमधील अनेक लोक देश सोडून जात आहेत. दरम्यान, रशियाही आपल्या हजारो नागरिकांना त्यांच्या देशात नेऊन ओलीस ठेवत आहे. आम्हाला युद्धात माघार घेण्यास भाग पाडण्याचा त्यांचा कट असल्याचा आरोपही युक्रेनने केला आहे.
रशिया युद्ध थांबविण्याचे नाव घेत नसल्याने नाटो देशांनी युक्रेनच्या सीमेवर युद्धाभ्यास सुरू केल्याने आता तिसरे महायुद्ध होऊ शकते, अशीही दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये काही चर्चेच्या फेऱ्याही पार पडल्या. मात्र, त्यातून काही निष्पन्न झाले नाही. याच दरम्यान आता रशिया 9 मे पर्यंत हे युद्ध संपवू इच्छित आहे, असा दावा युक्रेनच्या लष्कराने केला आहे. कारण 9 मे हा दिवस रशियामधील नाझी जर्मनीवरील विजय म्हणून साजरा केला जातो.